नवी दिल्ली- अमेरिकेच्या सरकारी संस्थांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर आरोप केल्यानंतर देशाच्या राजकारणात पडसाद उमटले आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अदानी यांना अटक करण्याची मागणी करत पंतप्रधान मोदींवर टीका केली.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले," माधवी बूच यांना सेबीतून हटवा. त्यांची चौकशी करावी. गौतम अदानी यांनी भारताला हायजॅक केलं आहे. पंतप्रधान मोदी हे अदानींना वाचवित आहेत. अदानी यांना भारतात कोणीही लावू शकत नाही. अदानी यांना अटक व्हावी. पण, त्यांना अटक होणार नाही. कारण, मोदी त्यांच्या पाठिशी आहेत. अदानी यांची चौकशी करावी, अशी विरोधी पक्षनेते म्हणून संसदेच्या अधिवेशनात चौकशीची मागणी करणार आहे."
एक है तो सेफ है-पुढे राहुल गांधी म्हणाले, " अदानी यांनी भारतीय आणि अमेरिकेचे दोन्ही देशांचे कायदे मोडले आहेत. सुमारे 2000 कोटींचा घोटाळा आणि इतर अनेक आरोप असूनही अदानी देशात मोकळे का फिरत आहेत? याचे मला आश्चर्य वाटते. मोदी हे अदानींच्या नियंत्रणात आहेत. त्यामुळे ते इच्छा असूनही कारवाई करू शकत नाहीत. अदानी जेलबाहेर का आहेत? अदानी यांची चौकशी करावी, अशी आम्ही अनेक दिवसांपासून मागणी करत आहोत. त्यांना आजच अटक झाली पाहिजे. नरेंद्र मोदींनी "एक है तो सेफ है'चा नारा दिला. भारतात अदानी आणि मोदी एक असतील तर ते सुरक्षित आहेत. झारखंडच्या मुख्यमंत्र्यादेखील अटक करण्यात आली. पण, अदानी अजून फिरत आहेत."
किरकोळ गुंतवणूकदारांची फसवणूक होत आहे. त्यामुळे माधवी बुच यांचा मुद्दा उपस्थित केला. किरकोळ गुंतवणुकदारांचे संरक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे. अदानी हे अमेरिका आणि भारत या दोन्ही देशातील गुंतवणुकदारांना खोटे बोलत आहे. त्यांनी गुन्हा केल्याचे अमेरिका म्हणत आहे. तर सीबीआय आणि सेबी कशामुळे गप्प आहे-विरोधी पक्षनेते राहुल गांधी
आम्ही मागे हटणार नाही-"भारतातील तरुणांना रोजगार मिळत नाहीत. जर कोणी किरकोळ गुन्हाही केला तर ते तुरुंगात जातात. पण आम्ही देशाला दाखवून देणार आहोत. केवळ अदानी नाहीत, तर त्यांच्यामागे संपूर्ण नेटवर्क आहे. माधबी बुच यांचा पर्दाफाश केला. भविष्यात आम्ही अशा आणखी व्यक्तींची माहिती जाहीर करणार आहोत. अदानी आणि मोदी एक आहेत, हे आम्ही सिद्ध केले आहे. आम्ही मागे हटणार नाही," असा इशारा राहुल गांधींनी दिला.
अदानी ग्रुपनं फेटाळले आरोप -अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशननं (Securities and Exchange Commission) अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर फसवणुकीचे आणि लाचखोरीचे आरोप केले आहेत. 250 दशलक्ष डॉलरची सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्याबाबत नियोजन करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला. अदानी समूहाच्या प्रवक्त्यानं अमेरिकन सरकारी संस्थांकडून करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत.
हेही वाचा-
- अदानींकडून गुंतवणुकदारांच्या फसवणुकीसह भारतीय अधिकाऱ्यांना कोट्यवधींची लाच, अमेरिकेत गंभीर आरोप
- गौतम अदानी अमित शाह यांची बैठक, मात्र त्यात शरद पवार नव्हते; संजय राऊतांचा दावा