नवी दिल्ली Gallantry Awards 2024 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सशस्त्र दलाच्या 80 जवानांना 'शौर्य पुरस्कार' जाहीर केले आहेत. यातील 12 जवानांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये सहा किर्ती चक्र पुरस्कारांचा समावेश असून, तीन जवानांना मरणोत्तर किर्ती चक्र पुरस्कार देण्यात येणार आहे. तसंच 16 जावानांना शौर्य चक्र पुरस्कारांनं सन्मानित करण्यात येणार आहे. यात दोन मरणोत्तर शौर्य पुरस्काराचा समावेश आहे. तर, 53 जणांना सेना पदकं जाहीर करण्यात आली आहेत. त्यातील सात जवानांना मरणोत्तर सेना पदक देण्यात येणार आहेत. यात एक नौसेना पदक (शौर्य) तसंच चार वायू सेना पदकांचा (शौर्य) समावेश आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित केलंय. यावेळी बोलताना त्यांनी राम मंदिराचा उल्लेख देखील केलाय. तसंच त्यांनी कर्पुरी ठाकूर यांना आदरांजली वाहिली. संबोधन करताना राष्ट्रपतींनी देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. 75 वा प्रजासत्ताक दिन हा ऐतिहासिक मैलाचा दगड आहे. हा एक युगप्रवर्तक काळ आहे. आपली मूलभूत तत्त्वं आठवण्याचा आजचा हा योग्य क्षण आहे, असं मुर्मू यांनी म्हटलं आहे.