नवी दिल्ली : पद्म पुरस्कारांमध्ये माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि अभिनेता चिरंजीवी यांचा समावेश आहे. अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनाही पद्मभूषण देण्याची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून पाच व्यक्तींना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलं आहे. माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याशिवाय, त्यात ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेत्री वैजयंतीमाला, प्रसिद्ध नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम, चिरंजीवी आणि बिंदेश्वर पाठक (मरणोत्तर) यांचा समावेश आहे. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तैवानची तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनीचे Hon Hai Technology Group (Foxconn) अध्यक्ष यंग लिऊ यांनाही गुरुवारी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
कोण आहेत यंग लिऊ :: फॉक्सकॉनच्या अधिकृत वेबसाइटनुसार, लिऊ हे चार दशकांहून अधिक उद्योग अनुभव असलेले एक मान्यताप्राप्त उद्योजक आहेत. लिऊ यांनी 1986 मध्ये दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकीमध्ये एमएस पदवी आणि 1978 मध्ये तैवानमधील नॅशनल चियाओ तुंग विद्यापीठातून इलेक्ट्रोफिजिक्समध्ये बीएस पदवी मिळवली आहे. त्यांनी तीन कंपन्या स्थापन केल्या आहेत. त्यांनी 1988 मध्ये यंग मायक्रो सिस्टम्स नावाची मदरबोर्ड कंपनी स्थापन केली. 1995 मध्ये त्यांनी नॉर्थब्रिज आणि साउथब्रिज आयसी डिझाइन कंपनीची स्थापना केली. ही कंपनी पीसी चिपसेटवर लक्ष केंद्रित करते. त्यांनी 1997 मध्ये ITE टेक आणि ADSL IC डिझाइन कंपनी ITX ची स्थापना केली.
दोन महिलाही सन्मानित : उद्योग आणि व्यवसाय जगतातील एकूण 4 जणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये 2 जणांना पद्मभूषण आणि 2 जणांना पद्मश्री देण्यात आला. जगातील सर्वात मोठी आयफोन निर्मिती कंपनी फॉक्सकॉनचे अध्यक्ष यंग वेई लिऊ यांचंही यामध्ये नाव आहे. तसंच, यंग वेई लिऊ व्यतिरिक्त सरकारने सीताराम जिंदाल यांनाही पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. तर कल्पना मोरपरिया आणि शशी सोनी या दोन महिला उद्योजकांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं आहे.
फॉक्सकॉन भारतात प्लांट उभारत आहे : आयफोन उत्पादक कंपनी फॉक्सकॉन लवकरच भारतातही आपला प्लांट सुरू करणार आहे. दरम्यान, सरकारनं पद्मभूषण पुरस्कारासाठी कंपनीचे अध्यक्ष यंग वेई लिऊ यांच्या नावाची निवड केली आहे. याशिवाय, सीताराम जिंदाल हे देशातील सर्वात मोठी ॲल्युमिनियम खाण कंपनी जिंदाल ॲल्युमिनियम लिमिटेडचे संस्थापक, अध्यक्ष आणि एमडी आहेत. त्यांची कंपनी देशांतर्गत बाजारपेठेसाठी सुमारे 25 टक्के ॲल्युमिनियमचे उत्पादन करते.