नवी दिल्ली Farmers Protest 2024 : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी काढण्यात आलेल्या शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं सरकारनं शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर अडवलं आहे. पोलीस प्रशासनानं आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांवर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या आहेत. त्यामुळं सध्या रस्त्यावर शुकशुकाट आहे. आज 3 केंद्रीय मंत्री शेतकरी नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. याबाबत "शेतकरी सकारात्मक या बैठकीला जाणार आहेत. आजच्या बैठकीत तोडगा निघेल," असा आशावाद पंजाब किसान मजदूर संघर्ष समितीचे सरचिटणीस सर्वन सिंग पंधेर यांनी व्यक्त केला.
आज केंद्रीय मंत्र्यांसोबत शेतकऱ्यांची बैठक :आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी चलो दिल्ली असा नारा दिला आहे. मात्र शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवरचं रोखण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी आक्रमक होत आंदोलन केल्यानं पोलीस प्रशासनानं शेतकऱ्यांवर अश्रूधुरांचे नळकांडे फोडले आहेत. त्यामुळं आता रस्त्यावर वर्दळ कमी झाली आहे. मात्र प्रशासनानं रोडवर मोठे बॅरिकेडस उभारले आहेत. त्यासह रोडवर खिळे ठोकण्यात आले आहेत. मात्र तरीही शेतकरी ट्रॅक्टर घेऊन दिल्लीकडं कूच करत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी आज केंद्रीय मंत्र्यांबरोबर शेतकरी नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीला तीन केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. तर विविध संघटनांचे शेतकरी नेते या बैठकीत आपली भूमिका मांडणार आहेत.