महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ईडीचं पथक दाखल; हेमंत सोरेन यांना अटक होणार?

ED team reached CM Hemant residence : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ईडीचं पथक पोहोचलंय. हे प्रकरण जमीन घोटाळ्याशी संबंधित असून त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ED team reached CM Hemant residence
ED team reached CM Hemant residence

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 29, 2024, 11:35 AM IST

नवी दिल्ली ED Team Reached CM Hemant Residence : जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाचं (ईडी) एक पथक राजधानी दिल्लीतील हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी पोहोचलंय. हेमंत सोरेन यांच्या दक्षिण दिल्लीतील पॉश भागातील शांती निकेतन निवासस्थानी ईडी पोहोचली. त्यांची जमीन घोटाळ्याप्रकरणी चौकशी होऊ शकते. तसंच या प्रकरणात त्यांना अटकही होऊ शकते. यामुळं त्यांच्या निवासस्थानाबाहेर आणि आत मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत.

नववं समन्स बजावण्यात आलं : अंमलबजावणी संचालनालयानं झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना 22 जानेवारी रोजी कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी नववं समन्स बजावलं होतं. त्यांना 29 किंवा 31 जानेवारी रोजी हजर राहण्यास सांगितलं होतं. ते हजर झाला नाहीत तर ईडीची टीम स्वत: त्यांची चौकशी करेल, असंही सांगण्यात आलं होतं.

सतत दुर्लक्ष करत होते हेमंत सोरोन : अंमलबजावणी संचालनालयानं 13 जानेवारी रोजी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना 8 वं समन्स जारी केलं होतं. त्यांना 16 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान या प्रकरणात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. यापूर्वी ते 7 तारखेच्या समन्सवर ईडीसमोर हजर झाले नव्हते. ईडीच्या समन्सला उत्तर देताना सीएम सोरेन म्हणाले होते की, "केंद्रीय तपास यंत्रणा 20 जानेवारीला त्यांच्या निवासस्थानी त्यांचं म्हणणं नोंदवू शकते."

काय आहे झारखंडच्या जमीन नुकसानाचं संपूर्ण प्रकरण : ईडीनं रांचीमध्ये सैन्यदलाच्या ताब्यात असलेल्या 4.55 एकर जमिनीची बेकायदेशीर खरेदी-विक्रीचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी केंद्रीय एजन्सीनं रांचीच्या बडागाईन झोनचे महसूल उपनिरीक्षक भानू प्रताप प्रसाद यांना अटक केली होती. त्यांच्या राहत्या घरातून मोठ्या प्रमाणात सरकारी कागदपत्रे आणि मोबाईल जप्त करण्यात आले होते. सध्या ईडी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची या कागदपत्रांची तपासणी आणि त्यांच्याशी संबंधित तथ्यांच्या पडताळणीसंदर्भात चौकशी करतंय.

आतापर्यंत 14 आरोपींना अटक : या प्रकरणात प्रदीप बागची, विष्णू कुमार अग्रवाल, भानू प्रताप प्रसाद आणि इतरांविरुद्ध झारखंड पोलीस आणि पश्चिम बंगाल पोलिसांनी दाखल केलेल्या अनेक गुन्ह्याच्या आधारे ईडीनं मनी लाँडरिंग कायद्याच्या कलमांखाली गुन्हा नोंदवून तीन जमीन घोटाळ्यांचा तपास सुरू केला होता. या प्रकरणाचा तपास पुढं जात असताना ईडीनं आतापर्यंत 14 आरोपींना अटक केलीय. या आरोपींनी सरकारी अधिकाऱ्यांच्या संगनमतानं भूमाफियांच्या नावे फसवणूक करुन भूखंड हस्तांतरित केल्याचं तपासात उघड झालंय.

236 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता जप्त : या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 14 आरोपींमध्ये प्रदीप बागची, अफसर अली, सद्दाम हुसेन, इम्तियाज अहमद, तल्हा खान, फैयाज खान, भानू प्रताप प्रसाद, छवी रंजन, आयएएस (माजी डीसी रांची) दिलीप कुमार घोष, अमित कुमार अग्रवाल, विष्णू कुमार अग्रवाल यांचा समावेश आहे. जमीन घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेनं आतापर्यंत 236 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त केलीय.

हेही वाचा :

  1. सत्तापालट झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधींंची बिहारमध्ये 'भारत जोडो न्याय यात्रा', काँग्रेसनं आखली रणनीती
  2. नितीश कुमारांनी नवव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, राजभवनात 'जय श्री राम'च्या घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details