मुंबई/पुणे Kolkata Doctor Rape Murder Case : कोलकाता इथल्या आर जी कार वैद्याकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील पदव्युत्तर विभागातील डॉक्टरवर अत्याचार करुन त्यांचा खून करण्यात आल्यानं देशभर संताप उफाळला आहे. या पीडितेला न्याय मिळण्यासाठी आज डॉक्टरांच्या विविध संघटनांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे फक्त अत्यावश्यक सेवा वगळता सगळ्या रुग्णालयात संप पुकारण्यात आल्याची माहिती मार्डचे सरचिटणीस डॉ अक्षय डोंगरदिवे यांनी वृत्तसंस्थेला बोलताना दिली. सकाळी 9 वाजातापासून हा संप पुकारण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
ससून रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचं आंदोलन : कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारलं. राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांचा संप असून, पुण्यातील ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी देखील संप पुकारला. आज ससून रुग्णालयात या निवासी डॉक्टरांकडून आंदोलन करण्यात आलं.
बंगालमध्ये डॉक्टर तरुणीवर अत्याचार करुन खून :कोलकाता इथल्या आर जी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील सेमिनार हॉलमध्ये एका डॉक्टर तरुणीचा खून करण्यात आला. महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये ही डॉक्टर तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली. विशेष म्हणजे या डॉक्टर तरुणीच्या अंगावर विविध जखमा आढळून आल्या. त्यासह पीडितेच्या अंगावर अर्धवट कपडे आढळून आल्यानं तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची चर्चा आहे. डॉक्टर तरुणीचा मृतदेह आढळून आल्यानं आर जी कार वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदीप घोष यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र डॉक्टर तरुणीचा मृतदेह आढळून आल्यानं देशभर संतापाची लाट निर्माण झाली आहे.