रांची DJ Murder in Bar : झारखंडची राजधानी रांचीत मृत्यूचं भयावह दृश्य समोर आलय. बार कर्मचाऱ्यावर गोळी झाडण्यात आलीय. गोळीबाराची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालीय. डीजे संदीप आधीच घरी जाण्यासाठी उभा आहे, तिथं एक माणूस चेहरा झाकून बारच्या पायऱ्यांवर पोहोचतो. हातात रायफल आणि चेहऱ्यावर कापड बांधलेला तरुण तिथं पोहोचताच त्यानं संदीपच्या छातीत गोळी झाडली. गोळी झाडल्यानंतर संदीप लिफ्टजवळ पडतो, त्याचवेळी ज्यानं त्याला गोळी मारली तो बाहेर येतो आणि बाहेरुन बारवर अनेक वेळा गोळीबार करतो आणि नंतर आपल्या पांढऱ्या कारमध्ये बसून पळून जातो, असं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतंय.
पोलिसांनी संशयितांना घेतलं ताब्यात : ही संपूर्ण घटना रांचीच्या चुटिया पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या एका बारमध्ये घडलीय. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सोमवारी सकाळी घटनास्थळ गाठून तपास सुरू केलाय. रांचीचे एसएसपी चंदन कुमार सिन्हाही घटनास्थळी पोहोचले. तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशीही केली जातेय.