नवी दिल्ली- क्रिप्टोचलनात पैसे गुंतविण्याचं आमिष दाखवून गेनबिटकॉइन कंपनीनं (cryptocurrency investment scam) देशभरात गुंतवणूकदारांना सुमारे ६,६०० कोटी रुपयांचा चुना लावला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयनं मंगळवारी दिल्ली एनसीआर, पुणे, चंदीगड, नांदेड, कोल्हापूर आणि बंगळुरूसह ६० शहरांमध्ये छापे टाकले. यात घोटाळ्यातील प्रमुख आरोपींशी संबंधित असलेल्या ठिकाणी छापे टाकल्याची माहिती सीबीआयच्या प्रवक्त्यानं दिली.
क्रिप्टोचलन घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अमित भारद्वाज याचा मृत्यू झाला असला तरी सीबीआयकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे. अमित भारद्वाज आणि त्याचा भाऊ अजय भारद्वाज हे घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहेत. त्यांनी २०१५ पासून क्रिप्टोकरन्सीचे आमिष दाखवित गुंतवणुकदारांना गंडा घालण्यास सुरुवात केली. गुंतवणुकदारांनी १८ महिन्यांकरिता गुंतवणूक केल्यास त्यांना दरमहा १० टक्के परतावा देण्याचं आमिष दाखविण्यात आलं होतं. गुंतवणुकदारांना क्लाउड मायनिंग करार करत क्रिप्टोचलन खरेदी करून ते गेनबिटकॉईनमध्ये (GainBitcoin cryptocurrency scam ) जमा करून घेत फसविले जात होतं.
अशी झाली फसवणूक-जास्तीत जास्त गुंतवणूकदारांना आमिष दाखविण्याकरिता घोटाळेबाज अनेकदा एमएलएम मार्केटिंगचा वापर करतात. या घोटाळ्यातदेखील एमएलएम मार्केटिंगचा वापर करण्यात आला. सीबीआय प्रवक्त्याच्या माहितीनुसार सुरुवातीच्या काळात गुंतवणुकदारांना बिटकॉईनमध्ये परतावा दिला जात होता. त्यानंतर २०१७ मध्ये भांडवलाचा पैसा कमी पडू लागल्यानंतर कंपनीचा तोटा झाला. हा तोटा लपविण्यासाठी बिटकॉईनपेक्षा अत्यंत कमी मूल्य असलेल्या क्रिप्टोचलनात पैसे दिले जायचे. त्यामुळे गुंतवणुकदारांची पुन्हा एकदा दिशाभूल झाली. सुरुवातीच्या काळात, गुंतवणूकदारांना बिटकॉइनमध्ये पेमेंट मिळत होते, ज्यामुळे फायदेशीर उपक्रमाचा भ्रम निर्माण झाला. तथापि, २०१७ पर्यंत नवीन भांडवलाचा ओघ कमी होत असताना, हा गोंधळ उडू लागला.