महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

इंडिया आघाडीचं नेतृत्व काँग्रेसनं सोडण्याची गरज - मणिशंकर अय्यर यांचा घरचा आहेर - MANI SHANKAR AIYAR

इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याच्या मुद्द्यावर मणिशंकर अय्यर यांनी कॉंग्रेसला घरचा आहेर दिला आहे. इंडिया आघाडीचं नेतृत्व काँग्रेसनं सोडण्याची गरज आहे, असं मणिशंकर अय्यर म्हणालेत.

मणिशंकर अय्यर
मणिशंकर अय्यर (File image)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 24, 2024, 3:19 PM IST

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. इंडिया ब्लॉकचं नेतृत्व करण्याबाबत काँग्रेसनं विचार करू नये तर ज्याला या आघाडीचं नेतृत्व करण्याची इच्छा आहे, त्यांना नेतृत्व करण्याची संधी द्यावी, असं मत अय्यर यांनी व्यक्त केलं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यामध्ये या इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे. तसंच या आघाडीतील अन्य पक्षांच्या काही नेत्यांमध्ये देखील ही क्षमता आहे, अशी टिप्पणी अय्यर यांनी केली आहे.


नेतृत्वाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह -केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार विरोधात इंडिया आघाडीच्या माध्यमातून देशभरात लोकसभा निवडणुकीत लढा देण्यात आला. मात्र गेल्या काही काळापासून या आघाडीचं नेतृत्व करण्यावरुन वाद उफाळून आला आहे. काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी या आघाडीचं नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ममता बॅनर्जींच्या या इच्छेला इंडिया आघाडीतील काही घटक पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. महाराष्ट्र विधानसभेत इंडिया आघाडीचा भाग असलेल्या महाविकास आघाडीला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर इंडिया आघाडीच्या नेतृत्वाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उभे केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या टिप्पणीमुळे काँग्रेसला घरचा आहेर मिळाला आहे.

आघाडीचं नेतृत्व केलं नाही तरीही... -काँग्रेसनं इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याबाबत विचार करू नये, ज्यांना इच्छा आहे त्यांना ही संधी द्यावी, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्याचवेळी या आघाडीचं नेतृत्व कोणीही केलं तरी त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं स्थान काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसच्या नेतृत्वाला आघाडीत नेहमीच राहील, असंही अय्यर म्हणाले आहेत. काँग्रेसनं आघाडीचं नेतृत्व केलं नाही तरीही देशातील विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसचं महत्त्वपूर्ण स्थान कायम राहील. राहुल गांधींना या आघाडीच्या अध्यक्ष पदाच्या स्वरूपात जेवढा सन्मान मिळेल त्यापेक्षा जास्त सन्मान त्यांना काँग्रेसचे प्रमुख म्हणून मिळेल असं ते म्हणाले आहेत.


इंडिया आघाडीच्या बैठकीत बहुमताने निर्णय होईल - काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते सुरेंद्र राजपूत याबाबत म्हणाले, इंडिया आघाडी ही 36 पक्षांची आघाडी आहे. या आघाडीतील अनेक नेत्यांमध्ये या आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे. इंडिया आघाडीची जेव्हा बैठक होईल तेव्हा त्यामध्ये नेतृत्वाबाबत चर्चा झाली तर बैठकीत उपस्थितांच्या बहुमतानं निर्णय घेतला जाईल. याबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला. माजी मंत्री, कॉंग्रेसचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी या विषयावर आपण बोलू शकत नाही, असं स्पष्ट केलं. महाराष्ट्र विधानसभेतील माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आपण याबाबत माहिती घेऊन नंतर बोलू, अद्याप याबाबत काही वाचलं किंवा ऐकलं नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

हेही वाचा..

  1. यूपीए-२ च्या पराभवावरून मणिशंकर यांचा गांधी परिवारावर निशाणा, राज्यातील काँग्रेस नेत्यांना काय वाटते?
  2. Mani Shankar Aiyar 2014 पासून आपल्याला अमेरिकेचा गुलाम असल्यासारखी वागणूक- मणिशंकर अय्यर
  3. मणिशंकर अय्यर यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर उपस्थित केला प्रश्न; वाचा नेमकं काय म्हणाले?

ABOUT THE AUTHOR

...view details