गोरखपुर : ज्ञानवापीवर केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल एएसआयनं नुकताच सार्वजनिक केला आहे. यामध्ये दावा करण्यात आला आहे की, ज्ञानवापीमध्ये सुमारे 32 पुरावे सापडले आहेत. त्यामधून ते पूर्वी मंदिर असल्याचं सिद्ध होतं. या प्रकरणारवर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच उघडपणे प्रतिक्रिया दिलीय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "भारताची संस्कृती आणि भारतीय लोक इतिहासाच्या पलीकडे आहेत. तसंच, अयोध्येत राम मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली". त्याचा दाखला देताना योगी आदित्यनाथ म्हणाले, "ज्ञानवापीवरील एएसआयचा जो अहवाल आलाय. हा अहवाल बरंच काही सांगतोय".
ते आपल्या इतिहासाच्या पलीकडे आहे :मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले, "आमची परंपरा अशी आहे की, ज्याचा आम्हाला अभिमान वाटला पाहिजे. आपल्या प्राचीन परंपरा आणि संस्कृतीकडे बघून आम्हा भारतीयांना आणखी गर्व वाटायला हवा. हे जे सगळं आहे ते आपल्या इतिहासाच्या पलीकडं आहे. त्यामुळे हा काळ आपल्याला इतिहासाच्या कक्षेतही मर्यादित करू शकत नाही. आपला इतिहास हजारो आणि लाखो वर्षांचा आहे", असंही योगी यावेळी म्हणाले आहेत.
काय आहे ASI सर्वेक्षणात? : ज्ञानवापी येथे एएसआयच्या सर्वेक्षण अहवालात दावा करण्यात आला आहे की, तेथील धार्मिक स्वरूप केवळ मंदिराचं आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या 839 पानांच्या सर्वेक्षण अहवालात असं आढळून आलं की, प्रार्थनास्थळाच्या ठिकाणी एक मोठे मंदिर आहे. एएसआयनं आपल्या अहवालात छायाचित्रांसह याचा पुरावाही दिला आहे. यामध्ये मंदिर पाडल्यानंतरच प्रार्थनास्थळ बांधण्यात आल्याचा दावा करण्यात आला.
ज्ञानवापीमध्ये काय सापडलं? :एएसआयने आपल्या सर्वेक्षण अहवालात दावा केला आहे की, ज्ञानवापी संकुलात मंदिराच्या अस्तित्वाचे 32 पुरावे सापडले आहेत. ज्ञानवापीचे धार्मिक रूप हिंदू मंदिराचं आहे. मंदिर पाडून तिथे प्रार्थनास्थळ बांधण्यात आलं. ज्ञानवापीच्या स्तंभांवर हिंदू देवी-देवतांची चिन्हे असल्याचा दावाही यामध्ये करण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्ञानवापीच्या खांबांवर पशु-पक्ष्यांच्या खुणा आढळून आल्याचंही सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आलं आहे.