प्रयागराज (उत्तर प्रदेश) : प्रयागराज येथील महाकुंभ मेळा (Maha Kumbh Mela) परिसरात भीषण आग लागली. यानंतर लगेच अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. दरम्यान, या घटनेमुळं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तर कॅम्पमध्ये ठेवलेल्या अनेक सिलिंडरचा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
कोणतीही जीवितहानी नाही : प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आलं. त्यांच्याकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीमध्ये सामान जळून खाक झालंय. अग्निशमन दलाच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू होतं. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती मिळत आहे.
सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळं लागली आग : महाकुंभ टेंट सिटीमध्ये लागलेल्या भीषण आगीत जवळपास २० ते २५ तंबू जळाल्याचं वृत्त आहे. स्वस्तिक गेटजवळ तसंच आखाडे असलेल्या पुलाखाली ही आग लागली होती. त्याचवेळी अग्निशमन विभागाने सेक्टर १९ चा परिसर सील केला. अग्निशमन विभागाच्या अनेक गाड्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत होत्या. जोरदार वाऱ्यामुळं आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत होत्या. तंबूत स्वयंपाक करत असताना आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर आगीने आणखी तंबूंना वेढलं. स्वयंपाकघरात ठेवलेल्या सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळं आग अधिकच तीव्र झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली.
कुंभमेळा चर्चेत : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे बहुचर्चित अशा या कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. देशासह परदेशातील नागरिक या कुंभमेळ्यात सहभागी होत आहेत. देशभरातील अनेक व्हीव्हीआयपी देखील या कुंभमेळ्याला भेट देत आहेत. त्यामुळं सुरक्षेच्या अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
#WATCH | Prayagraj, Uttar Pradesh | A fire breaks out at the #MahaKumbhMela2025. More details awaited. pic.twitter.com/pmjsAq9jkA
— ANI (@ANI) January 19, 2025
महाकुंभ मेळाव्याची सुरुवात : तीर्थक्षेत्र असलेल्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराज शहरात 13 जानेवारीपासून महाकुंभ मेळा सुरू झाला आहे. पौष पौर्णिमेला महाकुंभ मेळाव्यात आलेले भाविक मोठ्या संख्येनं संगम किनाऱ्यावर पोहोचले आहेत. गंगा, यमुना आणि 'गुप्त' असलेल्या सरस्वती नदीचा प्रयागराज येथे संगम झाला आहे. झांज आणि ढोल वाजवून अनेक भाविक भजन गात असल्याचं दिसून येत आहे. महाकुंभ मेळाव्यात ७ स्तरीय कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
हेही वाचा -