नवी दिल्ली Encounter in Jammu Doda :स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण देशासाठी एक दुःखद बातमी आहे. जम्मू-काश्मीरमधील डोडा भागात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत कॅप्टन दीपक सिंह हुतात्मा झाले आहेत. डोडाच्या आसार जंगलात दहशतवाद्यांच्या शोधात सैन्याचं ऑपरेशन सुरू आहे. यावेळी जवानांनी एक दहशतवाद्याला ठार केलंय. तसंच तीन दहशतवाद्यांना घेरलं आहे.
दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू :अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळपासून असारच्या जंगलात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरूच होता. बुधवारी सकाळी शोध मोहिमेदरम्यान घनदाट जंगलात दहशतवादी आणि सैन्यदल यांच्यात चकमक सुरू झाली. या घटनेत 48 राष्ट्रीय रायफल्सचे कॅप्टन दीपक सिंह गंभीर जखमी झाले. त्यांना सैन्यदलाच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं त्यांना तपासून मृत घोषित करण्यात आलं.
गुरुवारी डेहराडूनला पार्थिव आणणार :डेहराडूनच्या रेसकोर्स परिसरात राहणारे 25 वर्षीय कॅप्टन दीपक सिंह यांचं पार्थिव गुरुवारी डेहराडूनला आणण्यात येणार आहे. मूळचे अल्मोडा येथील रानीखेत येथील कॅप्टन दीपकचं कुटुंब आता रेसकोर्स, डेहराडून येथे राहतात. कॅप्टन दीपक 13 जून 2020 रोजी सैन्यात दाखल झाले होते. दीपक सिंह हे काउंटर इन्सर्जन्सी 48 राष्ट्रीय रायफल्समध्ये सिग्नल ऑफिसर म्हणून तैनात होते. ते क्विक रिॲक्शन टीमचे नेतृत्व करत होते.
डोडामध्ये 30 दिवसांत दुसरा हल्ला :16 जुलै रोजीही डोडा येथील देसा भागात झालेल्या चकमकीत कॅप्टनसह 5 जवान हुतात्मा झाले होते. जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात 30 दिवसांतील हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी 16 जुलै रोजी रात्री 9 वाजता देसा फॉरेस्ट परिसरात सैन्यदलाची दहशतवाद्यांबरोबर चकमक झाली होती. या चकमकीत सैन्यदलाच्या कॅप्टनसह 4 जवान हुतात्मा झाले होते. यात एका पोलिसाचाही मृत्यू झाला होता. या चकमकीची जबाबदारी जैश या दहशतवादी संघटनेनं घेतली होती.