कोलकाता Doctor Murder Case : कोलकाता येथील आरजी मेडिकल कॉलेजमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याच्या प्रकरणानंतर पश्चिम बंगालमधील वातावरण तापलं आहे . या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं 'फेडरेशन ऑफ ऑल इंडिया रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन'ने 12 ऑगस्टपासून संपूर्ण देशात संपाची घोषणा केली आहे. सर्व सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टर संघटनांना संपात सहभागी होण्याचं संघटनेनं आवाहन केलं आहे.
निवासी डॉक्टरांच्या संपाच्या कालावधीत ओपीडी, इलेक्टिव्ह सर्जरी आणि लॅबमधील काम बंद ठेवण्यात येणार आहे. आरडीएनंही डॉक्टरांना संपावर जाण्याची नोटीस दिली आहे. आरजी मेडिकल कॉलेजचे कनिष्ठ डॉक्टरही पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी सातत्यानं आंदोलन करत आहेत.
एका व्यक्तीला अटक :याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटकही केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव संजय रॉय असं आहे. मात्र, या गुन्ह्यात अनेक जणांचा समावेश असू शकतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
- वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षकांना पदावरुन हटवलं :पश्चिम बंगालच्या आरोग्य विभागानं आरजी कर मेडिकल कॉलेजचे अधीक्षक डॉ. संजय वशिष्ठ यांना हटविण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी महिला डॉक्टरचा मृतदेह सापडल्यानंतर निवासी डॉक्टरांनी महाविद्यालयाच्या अधीक्षकांना हटवण्याची मागणी केली होती.