लखनौ- बंगळुरूमधील अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणात बंगळुरू पोलिसांनी त्यांच्या सासू आणि मेहुण्याला प्रयागराजमधून अटक केली. त्याचवेळी अतुल सुभाष यांची पत्नी निकिता सिंघानिया हिला बंगळुरू पोलिसांनी गुरुग्राम (हरियाणा) येथून अटक केली आहे. बंगळुरू पोलिसांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.
बंगळुरूमधील (कर्नाटक) व्हाइट फील्ड डिव्हिजनचे पोलीस उपायुक्त शिवकुमार यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत अतुल सुभाष यांच्या मृत्यू प्रकरणात केलेल्या कारवाईची माहिती दिली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, "अतुल सुभाषची पत्नी आणि मेहुण्याला प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. त्याची पत्नी निकिता सिंघानिया हिला पोलिसांनी गुरुग्राम (हरियाणा) येथून अटक केली. सर्वांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे".
काय आहे अतुल सुभाष मृत्यू प्रकरण? एआय अभियंता अतुल सुभाष मोदी यांनी पत्नी निकिता आणि सासरच्या मंडळींवर छळ केल्याचा आरोप करत 9 डिसेंबर रोजी त्यांनी बंगळुरू येथे आत्महत्या केली. मृत्यपूर्वी त्यांनी केलेल्या व्हिडिओत न्यायाधीशांवरदेखील आरोप केले. या प्रकरणाची संपूर्ण देशभरात चर्चा झाली. बंगळुरू पोलिसांनी पीडित अतुल यांची पत्नी निकिता, आई निशा आणि भावांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. निकिता आणि तिच्या कुटुंबाच्या शोधात बंगळुरू पोलीस जौनपूर आणि दिल्लीत पोहोचले. दरम्यान, जौनपूर येथे राहणारी निकिताची आई आणि भाऊ घराला कुलूप लावून निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बंगळुरू पोलिसांनी आरोपींचा शोध घेत त्यांना अखेर अटक केली.
पोलिसांच्या दोन विशेष पथकांकडून तपास-अतुल सुभाष प्रकरणाचा तपास करण्यासाठी बंगळुरू पोलिसांनी दोन विशेष पथके तयार केले आहेत. मुख्य तपास अधिकारी म्हणून एका पोलीस निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहेत. त्यांच्याकडं प्रकरणाशी संबंधित आवश्यक पुरावे गोळा करण्याचे आणि अतुलच्या भावानं दाखल केलेल्या तक्रारीत नाव असलेल्या लोकांना अटक करण्याचे काम सोपविण्यात आलं आहे. स्थानिक अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य करण्यासाठी यापैकी एक पथक आधीच उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे पाठवण्यात आलं होतं.
- उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल:शनिवारी आरोपी पत्नी निकिता सिंघानिया आणि तिच्या कुटुंबातील इतर व्यक्तींनी अलाहाबाद उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. अटक टाळण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, तिन्ही आरोपींना बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा-
- ...तर अतुल सुभाष यांनी आत्महत्या केली नसती, पत्नी पीडित संघटनेच्या अध्यक्षांचा दावा
- अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण: पत्नीच्या छळाला कंटाळून अभियंत्याची आत्महत्या, पत्नी, सासूवर गुन्हा