नवी दिल्ली : संसदेत आज संविधानावर जोरदार चर्चा झाली. यावेळी विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी त्यांची मतं मांडली. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेत भाग घेताना संविधानाचं महत्त्व सांगितलं. त्याचवेळी त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. काँग्रेसनं नेहमीच संविधानाचा अपमान केल्याचा दावा नरेंद्र मोदी यांनी केला.
नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, भारत लोकशाहीची जननी आहे आणि संविधानाचा 75 वर्षांचा प्रवास हा जगातील सर्वात मोठ्या आणि महान लोकशाहीचा संस्मरणीय प्रवास आहे. 'भारतीय राज्यघटनेच्या 75 वर्षांचा गौरवशाली प्रवास' या विषयावरील चर्चेदरम्यान लोकसभेत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, संविधानाच्या 75 वर्षांच्या देशाच्या वाटचालीचा केंद्रबिंदू म्हणजे संविधान रचनाकारांची दृष्टी आहे.
पंतप्रधानांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबत काँग्रेसमध्ये कटुता.
- काँग्रेसनं संविधानाचा अनेकवेळा अपमान केला.
- पं. नेहरुंना आरक्षणाविरोधात भाषणं केली.
- आपल्या व्होटबँक राजकारणासाठी काँग्रेसनं आरक्षणाचा खेळ केला.
- सत्तेसाठी काँग्रेसकडून आरक्षणाचा गैरवापर करण्यात आला.
- संविधान सभेनं युनिफॉर्म सिव्हील कोड (समान नागरी कायदा) संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा केली.
- धार्मिक आधारावर तयार केलेल्या पर्सनल लॉ बोर्ड समाप्त करण्याची शिफारस बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती.
- सरदार पटेल यांना पंतप्रधान पदासाठी विविध समित्यांची सहमती होती.
- तरीही नेहरू यांना पंतप्रधान करण्यात आलं. नाही तर सरदार पटेल पंतप्रधान झाले असते.
- आम्ही संविधानात बदल केले मात्र 'डंके की चोट पर' गरिब ओबीसांच्या कल्याणासाठी केले.
- स्वार्थासाठी आम्ही संविधानात बदल केला नाही.
- काँग्रेसनं चार पिढ्या गरिबी हटावो चा जुमला वापरला.
- गरिबांच्या नावावर जुमले बाजीतून बँकांचं राष्ट्रीयीकरण केलं.
- मात्र गरिबांनी बँकेची पायरीही चढली नाही. मात्र ५० कोटी गरिबांची खाती उघडली.
- पूर्वी जनतेपर्यंत एक रुपयातील १०-१५ पैसे पोहोचायचे आता पूर्ण रुपया थेट खात्यात जमा होतो.
- कलम ३७० साठी संविधानात दुरुस्ती केली.
- स्वार्थासाठी आम्ही कधीच संविधानात दुरुस्ती केली नाही.
"भारताच्या संविधानाचा आजपर्यंतचा प्रवास हा जगातील महान आणि सर्वात मोठ्या लोकशाहीचा एक संस्मरणीय प्रवास आहे. संविधान निर्माते, त्यांचं योगदान आणि 75 वर्षे पूर्ण करण्याचा आमचा संकल्प हा आमच्या संविधानाचं आणि त्यातील तरतुदींचं महत्त्व साजरं करण्याचा क्षण आहे," असं पंतप्रधान मोदी म्हणाले, "तुम्हा सर्वांना या उत्सवात सहभागी होताना पाहून मला आनंद झाला. त्यामध्ये सामील झालेल्या संसदेच्या सर्व सन्माननीय सदस्यांचं मी मनापासून आभार मानतो.” पंतप्रधान म्हणाले की, "देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारतासाठी व्यक्त करण्यात देशविघातक शक्यतांचा पराभव करून भारताच्या संविधानानं आपल्याला इथंवर आणलं आहे. या महान कामगिरीसाठी, संविधानाच्या मसुदाकर्त्यांसोबतच, भारताच्या करोडो जनतेसमोर मी आदरपूर्वक नतमस्तक होऊ इच्छितो. - त्यांनी ही नवीन व्यवस्था जगली... भारतातील नागरिक सर्व कौतुकास पात्र आहेत." ते पुढे म्हणाले, "आपल्या सर्वांसाठी, सर्व नागरिकांसाठी आणि जगभरातील लोकशाहीप्रेमी नागरिकांसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे." आज लोकसभेत संविधानाच्या ७५ वर्षांच्या दोन दिवसीय चर्चेला सुरुवात झाली.