नवी दिल्ली Manoj Soni Resigns : वादग्रस्त परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणानं केंद्रीय लोकसेवा आयोगाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. अशातच आता केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मनोज सोनी यांनी वैयक्तिक कारणानं राजीनामा देत असल्याचं स्पष्ट केलं आहे.
लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी :केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मनोज सोनी यांचा कार्यकाळ अद्यापही पूर्ण व्हायचा बाकी आहे. मात्र त्या अगोदरच त्यांनी राजीनामा दिल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. मनोज सोनी यांचा कार्यकाळ मे 2029 मध्ये संपणार आहे. मात्र परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणाशी मनोज सोनी यांच्या राजीनाम्याचा कोणताही संबंध नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनोज सोनी यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचं नमूद केलं असून त्यांचा राजीनामा अद्यापही स्वीकारण्यात आला नसल्याची माहितीही या सूत्रांनी दिली आहे.
मनोज सोनी यांनी केली पदमुक्त होण्याची विनंती :प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ मनोज सोनी यांनी 16 मे 2023 रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून पदभार घेतला. त्यांचा कार्यकाळ 15 मे 2029 ला संपणार आहे. मात्र केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष बनल्यानंतर मनोज सोनी यांनी पदमुक्त होण्याची विनंती केली. मात्र त्यांची विनंती मान्य करण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. "मनोज सोनी यांना सामाजिक आणि धार्मिक कार्यात काम करण्यासाठी अधिक वेळ द्यायचा आहे."