नवी मुंबई : नवी मुंबई परिसरातील कामोठे येथील सेक्टर 6 मधील ड्रीम्ज आपार्टमेंटमध्ये माय-लेकाचा मृतदेह आढळला होता. हत्या की आत्महत्या? हे गूढ आता उकललं असून, या दोघांचीही हत्याच झाल्याचं शवविच्छेदनात स्पष्ट झालंय. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केलीय. समलैंगिक संबंधाचा आग्रह धरल्यानं या दोन हत्या करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.
काय आहे प्रकरण : नवी मुंबईतील कामोठे परिसरातील सेक्टर 6 येथील सरोवर हॉटेलच्या बाजूला असणाऱ्या ड्रीम्ज लॅण्ड हाऊसिंग सोसायटीमधील फ्लॅट क्रमांक 104 चा दरवाजा आतून बंद असून घरातील व्यक्ती काहीही प्रतिसाद देत नाहीत अशी माहिती, 1 जानेवारीला कामोठे पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळाल्यानं पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. संबंधित ठिकाणचा दरवाजा अग्निशमन दलाच्या मदतीनं बाहेरून उघडून घराची पाहणी केली. त्यावेळी गीता भूषण जग्गी (70) त्यांचा मुलगा जितेंद्र भूषण जग्गी (45) हे दोघे मायलेक मृत अवस्थेत आढळून आले होते. मात्र, या दोघांची हत्या की आत्महत्या? हा प्रश्न पोलिसांना सतावत होता. अखेर माय-लेकाचे शवविच्छेदन झाल्यानंतर हत्येचं गूढ उकललं आहे.
दोघांना घेतलं ताब्यात : मृत जितेंद्र याच्या डोक्यात अंगावर मारल्याचे व्रण असल्यानं हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत होता. पोलिसांनी जेव्हा दरवाजा उघडून जग्गी कुटुंबीयांच्या घरात प्रवेश केला तेव्हा घरातील एलपीजी गॅस लिक असल्याचं आढळलं होतं. पोलिसांनी गॅस बंद केला आणि त्यानंतर या घटनेचा तपास सुरू केला. सोसायटीचे आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. कामोठे पोलीस आणि कळंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल चौगुले यांनी चौकशी केली असता संज्योत मंगेश दोडके (१९) शुभम महेंद्र नारायणी (१९) हे या कामोठे येथील संशयित तरुणांची माहिती मिळाली. त्यांना उलवे परिसरातून ताब्यात घेतलं आणि अटक केलं अशी माहिती पोलिसांनी दिली.
का केल्या दोन हत्या गूढ उकलले : संज्योत मंगेश दोडके आणि शुभम महेंद्र नारायणी हे दोघेही जितेंद्र जग्गी याच्या परिचयाचे होते. त्यांच्यात मैत्रीचे संबंध असल्यानं जितेंद्रने दोघांनाही ३१ डिसेंबरला त्याच्या घरी पार्टी करण्यासाठी बोलावलं होतं. तिघांनी प्रचंड दारू प्यायली, दारू प्यायल्यानंतर जितेंद्र हा संज्योत आणि शुभम यांना समलैगिंक सबंध ठेवण्यासाठी आग्रह करू लागला. याचा प्रचंड राग आल्यानं शुभम नारायणीने एक्सटेंशन बोर्ड जितेंद्र जग्गी यांच्या डोक्यात मारून त्याला ठार मारले. संज्योतने गीता जग्गी यांचा गळा आवळला आणि जाताना जितेंद्र याचा मोबाईल फोन, पाकीट, टॅब, दागिने चोरून नेले. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा -