बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; गावावर शोककळा, ग्रामस्थ संतापले - Leopard Attack On Child
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 19, 2024, 11:02 AM IST
अहमदनगर Leopard Attack On Child : अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्यावर बिबट्यानं हल्ला करुन त्याचा बळी घेतला. बिबट्यानं चिमुकल्याला सहाशे फूट फरफटत नेल्यानं त्याचा जाग्यावरच मृत्यू झाला. प्रथमेश वाघ असं त्या चिमुकल्याचं नाव आहे. बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याच्या मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे गावातील नागरिक संतप्त झाले आहेत.
राहाता तालुक्यातील चितळी गावापासून तीन किलोमीटर अंतरावर वाकडी रोडवरील काकडाई मंदिराजवळ मयूर दत्तात्रय वाघ यांची वस्ती आहे. 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याता सुमारास साडेतीन वर्षीय प्रथमेश मयूर वाघ हा घरासमोरील अंगणात खेळत होता. यावेळी त्याच्यावर घराशेजारी असलेल्या डाळींबाच्या बागेतून दबा धरुन बसलेल्या बिबट्यानं झेप घेत धूम ठोकली. बाहेर असलेल्या आजीनं आरडाओरडा केल्यानंतर घरातील सर्व जण बिबट्याच्या दिशेनं धावले. मात्र बिबट्या मिळून न आल्यानं त्यांनी डाळींब आणि मका पिकात शोध घेतल्यानंतर घरापासून सहाशे फूट असलेल्या गिनी गवतात रक्तबंबाळ अवस्थेत प्रथमेश हा चिमुरडा मिळून आला. बिबट्यानं जबड्यात धरुन प्रथमेशला नेल्यानं त्याच्या मानेला मोठ्या प्रमाणात जखम होऊन तो जागेवरच गतप्राण झाल्याचं नागरिकांनी यावेळी सांगितलं. यावेळी प्रथमेशला तातडीनं पुढील उपचारासाठी श्रीरामपूर शहरातील कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर असल्यानं वारंवार वनविभागाला याबाबत माहिती देण्यात येऊन परिसरात पिंजरे लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. मात्र आज वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे साडेतीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. या बालकाच्या मृत्यूस कारणीभूत वनविभागाचे अधिकारी असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.