पुणे Abhijit Kunte : भारताचे चौथे आणि पुण्याचे पहिले ग्रँड मास्टर अभिजित कुंटे यांना प्रशिक्षक म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जागतिक बुद्धिबळ महासंघ (फिडे) 'वख्तांग कार्सेलाडझे' या पुरस्कारानं सन्मानित करणार आहे. हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवरील बुद्धिबळ क्षेत्रात अत्यंत मानाचा समजला जातो.
सर्वोत्तम प्रशिक्षकाचा पुरस्कार : 'फिडे'च्या वतीनं 2023 या वर्षासाठी देण्यात येणारा सर्वोत्तम प्रशिक्षकाचा पुरस्कार भारताच्या अभिजित कुंटे आणि आरबी रमेश यांना जाहीर झाला आहे. अभिजित कुंटे यांनी महिला संघाना प्रशिक्षण देताना केलेल्या यशस्वी कामगिरीसाठी 'वख्तांग कार्सेलाडझे' हा पुरस्कार, तर खुल्या विभागात सर्वोत्तम कामगिरीसाठी आरबी रमेश यांना 'मिखाईल बोट्विनिक' हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आर. प्रज्ञानानंद, तसेच अरविंद चिदम्बरम, आर. वैशाली आणि सविता यांसारख्या खेळाडूंनी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.
अभिजित कुंटे यांची कामगिरी : ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांनी प्रशिक्षक म्हणून काम करताना 2021 साली भारतीय महिला संघाला जागतिक सांघिक विजेतेपद मिळवून दिलं. तसेच त्यांनी 2022 साली आशियाई स्पर्धेत रौप्य पदक आणि 44 व्या बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत कांस्य पदक मिळवून दिलं आहे.
अभिजित कुंटे यांची प्रतिक्रिया : "प्रशिक्षक म्हणून महिला आणि कुमारीच्या स्पर्धेतील सर्वोतम कामगिरी करता 'वख्तांग कार्सेलाडझे' पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल मी 'फिडे'चा आभारी आहे. खुल्या विभागासाठीचा पुरस्कार जिंकल्याबद्दल मी आरबी रमेश यांचंही अभिनंदन करतो. भारतीय खेळाडूंशिवाय हे यश आम्हाला शक्य झालं नसतं", अशी प्रतिक्रिया ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांनी दिली.
हे वाचलंत का :