मुंबई Lok Sabha Elections : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार हे निश्चित झालय. त्या पाठोपाठ आता जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदार संघातही हे चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा एकदा पक्षानं उमेदवारी दिली आहे. तर, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार एकनाथ खडसे यांना पक्षातर्फे उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, तब्येतीमुळे त्यांनी नकार दिलाय. त्यामुळं आता पक्षातर्फे त्यांच्या कन्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळं येत्या काळात एकनाथ खडसे आणि शरदचंद्र पवार गट काय निर्णय घेणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलय.
भाजपानं टाकला डाव : एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना विधान परिषदेचं सदस्यत्व दिलं. यादरम्यान त्यांच्या सूनबाई आणि भाजपाच्या खासदार रक्षा खडसे मात्र भाजपाबरोबरच राहिल्या. असं असतानाच आता रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन भारतीय जनता पार्टीनं खडसे कुटुंबाला अडचणीत आणलं आहे.
महाविकास आघाडीचा प्रचार करणार : या संदर्भात आमदार एकनाथ खडसे यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसकडून रावेर लोकसभा मतदारसंघासाठी सक्षम उमेदवार दिला जाणार आहे. त्यामुळं महाविकास आघाडीच्या धोरणानुसार आणि पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही मतदार संघात काम करणार आहोत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठीच काम करणार आहोत. ज्याप्रमाणे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या बारामतीत एकमेकांच्या विरोधात प्रचार करत आहेत. त्याच पद्धतीनं आम्ही रक्षा खडसे विरोधात प्रचार करणार असल्याचंही खडसे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
रक्षा खडसेंना मदत नाही : याविषयी प्रतिक्रिया देत रोहिणी खडसे म्हणाल्या की, रक्षा खडसे यांना भाजपानं पुन्हा उमेदवारी दिली आहे. परंतु, त्यांना उमेदवारी मिळाली म्हणून आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही, त्यांना मदत करणार नाही. त्या आमच्या कुटुंबातील सदस्य असल्या तरी सुद्धा त्यांना मदत केल्यास कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल. त्यामुळं आम्ही अशी कुठलीही कृती करणार नाही. त्यांचं आडनावही खडसेच असल्यानं दोन पाच टक्के मतांचा निश्चित फरक पडेल. परंतु जास्त फरक पडणार नाही आणि आम्ही पक्षानं दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करू.
माझे लक्ष्य विधानसभा : लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी संदर्भात विचारलं असता रोहिणी खडसे म्हणाल्या की, मला पक्षानं उमेदवारी संदर्भात विचारलं होतं. मात्र, माझं लक्ष्य हे विधानसभा असणार आहे. त्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून आम्ही तयारी करत आहोत, असं त्या म्हणाल्या.
भाजपा हेच माझं कुटुंब : खडसे कुटुंब या निवडणुकीत आपल्या सोबत असणार नाही यासंदर्भात रक्षा खडसे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, होय माझं कुटुंब या निवडणुकीत माझ्यासोबत नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. परंतु, माझा पक्ष माझ्यासोबत पूर्ण ताकदीनिशी उभा राहणार आहे. त्यामुळं आता ही लढाई अटळ आहे आणि ती मी निश्चितपणे लढणार आहे. मी एकटी पडलेली नाही. भाजपा हेच माझं कुटुंब आहे, असंही रक्षा खडसे म्हणाल्या.
हेही वाचा -