छत्रपती संभाजीनगर CM Eknath Shinde Banner : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅनरची चर्चा सध्या रंगली. अनेक ठिकाणी 'शिंदे सरकार, मराठा सरदार' अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले असून लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही आरक्षणाच्या मुद्द्यावरून मतदानावर परिणाम होण्याची चिन्हं आहेत. त्याच अनुषंगानं मराठवाड्यात असे बॅनर लावण्यात आलेत.
मराठा समाजाचं नेतृत्व करणारा नेता : लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा परिणाम दिसून आला. आगामी विधानसभा निवडणुकीत आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा निर्णायक ठरेल, अशी भीती व्यक्त होत आहे. राज्य सरकारमधील महत्त्वाचा घटक असलेल्या भाजपाच्या विरोधात मराठा समाज आक्रमक असतानां शिवसेना पक्षाचे नेते आम्ही मराठा असून, आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडवू शकतो, असा प्रचार सध्या करत आहेत.
काय आहे बॅनरवर? : "छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं शपथ घेतो की, मराठा समाजाला आरक्षण देणार" अशा आशयाचा मजकुर बॅनरवर छापण्यात आलाय. विशेष म्हणजे, महायुतीच्या जागा वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतली, त्याच दिवशी हे बॅनर लावण्यात आल्यानं बॅनरची चर्चा रंगली.
वेगवेगळ्या योजना राबणारा मराठा सरदार : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत असून, आता आचारसंहिता लागणार असल्यानं शिवसेनेकडून विविध योजनांच्या जाहिराती केल्या जात आहेत. मराठवाड्यात लावण्यात आलेल्या बॅनरवर 'शिंदे सरकार, मराठा सरदार' असा उल्लेख करण्यात आलाय. पाच वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर तयार करण्यात आले असून त्यात वेगवेगळ्या योजनांची माहिती देण्यात आली. शिवसेनेच्या युवा सेना महाराष्ट्र सचिव निलेश शिंदे यांनी हे बॅनर लावलेत. शिंदे सरकारनं राबविलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी आणि आरक्षण फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देणार, असा विश्वास देण्यासाठी बॅनर लागल्याचं निलेश शिंदे यांनी सांगितलं.
हेही वाचा
- राज ठाकरे पोहोचले चक्क सलमान खानच्या घरी; नेमकं कारण काय? - Raj Thackeray meet Salman
- महायुती, महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच; आजी-माजी नव्हे तर नवख्यांचीही नावं चर्चेत - Vidhan Sabha Election 2024
- बदलापूर घटनेतील आरोपीच्या एन्काऊंटरवर उदयनराजे म्हणाले; "गोळ्या घालून मारण्यापेक्षा...." - Akshay Shinde Encounter