मृत्यूच्या बातमीवर श्रेयस तळपदेची प्रतिक्रिया, 'अफवा पसरवणं थांबवा' - Actor shreyas talpade - ACTOR SHREYAS TALPADE
Shreyas talpade: श्रेयस तळपदेच्या निधनाची बातमी खूप वेगानं सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ही बातमी अफवा असून यावर आता श्रेयसनं आपली प्रतिक्रया दिली आहे.
Published : Aug 20, 2024, 11:12 AM IST
मुंबई- Shreyas talpade: बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेचं निधन झाल्याची अफवा सोशल मीडियावर सध्या पसरू लागली आहे. या अफवांचा सर्वांनाच धक्का बसला आहे. काही चाहत्यांनी या अफवा खऱ्या मानल्या. यानंतर अनेकांनी पोस्ट शेअर करून याबद्दल दु:ख व्यक्त केलं होतं. यानंतर या अफवा पाहून श्रेयस स्वत:ही हैराण आणि अस्वस्थ झाला. सोमवारी श्रेयस तळपदेचं निधन झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आता याप्रकरणी श्रेयसनं समोर येऊन या अफवांबद्दल प्रतिक्रया दिली आहे. लोकांनी अशा घातक अफवा पसरवू नयेत, अशी कळकळीची विनंती त्याने केली आहे.
श्रेयस तळपदेनं निधनाच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया: श्रेयस तळपदेनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, यामध्ये त्यानं लिहिलं, "डिअर ऑल, मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की मी जिवंत, आनंदी आणि निरोगी आहे. माझ्या निधनाचा दावा करणारी व्हायरल पोस्ट माझ्या समोर आली आहे. मला वाटतं की या मस्करीला एक वेगळं स्थान आहे, याचा गैरवापर केला तर हे खरोखरच हानी पोहोचवू शकते. मस्करी म्हणून जे सुरू झाले असणार, ते आता अनावश्यक चिंता निर्माण करत आहे. या अफवा माझी काळजी घेणाऱ्या लोकांच्या, विशेषतः माझ्या कुटुंबाच्या भावनांशी खेळत आहेत. यानंतर श्रेयसनं पुढं म्हटलं, "माझी लहान मुलगी, जी दररोज शाळेत जाते, ती आधीच माझ्या तब्येतीमुळे काळजीत असते. ती मला सतत प्रश्न विचारते की, तुम्ही बरे आहात का? मी ठीक असण्याचं तिला आश्वासन हवं असतं. ही खोटी बातमी तिची भीती वाढवत आहे. शाळेत तिला अधिक प्रश्नांना सामोरे जावं लागत आहे, या गोष्टीमुळे माझ्या कुटुंबावर विपरीत परिणाम होत आहे."
श्रेयसनं कुटुंबाबद्दल केली चिंता व्यक्त : यानंतर त्यानं पुढं म्हटलं, "या गोष्टीचा प्रचार करणाऱ्या सर्वांना मी आवाहन करतो की, त्याचा प्रभाव समजून घ्या आणि हे थांबवा. बऱ्याच लोकांनी माझ्या आरोग्यासाठी मनापासून प्रार्थना केली आहे आणि आता ही गोष्ट निराशाजनक आहे. माझ्या प्रियजनांना या गोष्टीचा त्रास होत आहे. आमचे जीवन यामुळे विस्कळीत होत आहे. जेव्हा तुम्ही अशी अफवा पसरवत असता, यामुळे त्या व्यक्तीवरच परिणाम होत नाही, तर त्याच्या कुटुंबाला आणि विशेषत: लहान मुलांना त्रास होतो. हा भावनिक आघात असतो. याशिवाय या बातमीनंतर श्रेयसनं त्याच्या प्रकृतीची विचारपूस करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. त्यानं पुढं म्हटलं, "या कठीण प्रसंगी माझ्याशी बोलणाऱ्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहोत. तुमची काळजी आणि प्रेम माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. मला ट्रोल करत असणाऱ्यासाठी एक साधी विनंती आहे, कृपया थांबा. अशा अफवा इतर कोणाच्याही बाबतीत पसरवू नका. तुमच्या बाबतीत असे काही घडू नये अशी माझी इच्छा आहे, कृपया संवेदनशील व्हा. इतरांच्या भावना समजून घ्या." आता श्रेयस ठणठणीत असल्याचं खुद्द त्याच्याच कडून कळल्यानं त्याचे चाहते खूश आहेत.
हेही वाचा :