सातारा : साताऱ्यातील चाळकेवाडी पठारावर पालीच्या गेको प्रजातीचा शोध लावण्यात वन्यजीव शास्त्रज्ञांना यश आलंय. हा शोध जैवविविधतेच्या संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पालीच्या नवीन प्रजातीच्या शोधामुळं महाराष्ट्राच्या पठारांवरील परिसंस्थेचं महत्त्व अधोरेखित झालंय. नवीन प्रजातीची पाल स्थानिक, दुर्मिळ आणि संकटग्रस्त प्रजातींसोबत चाळकेवाडी पठारावर आढळते.
सस्तन प्राण्यांच्या अन्न खळीतील महत्वाचा घटक : गेको प्रजातीची ही पाल स्थानिक परिसंस्थेच्या संतुलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. कीटक भक्षक म्हणून ती मच्छर, कोळी आणि अन्य किटकांचे प्रमाण नियंत्रित ठेवते. ज्यामुळं पर्यावरण निरोगी राहते. याशिवाय ही पाल शिकारी पक्षी, साप, आणि लहान सस्तन प्राण्यांच्या अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. तिच्या अस्तित्वामुळं स्थानिक जैवविविधतेचे अस्तित्व टिकून राहते. म्हणूनच हा शोध जैवविविधता संवर्धनासाठी खूप महत्त्वाचा असल्याचं निरीक्षण वन्यजीव शास्त्रज्ञ डॉ. अमित सय्यद यांनी नोंदवलंय.
जैवविविधतेनं नटलेलं चाळकेवाडी पठार : साताऱ्यातील चाळकेवाडी पठारावर अपोनोगेटॉन सातारेंसिस, हेमिडॅक्टायलस सातारेंसिस, सरडा सुपर्बा या प्रजातींच्या पालींबरोबरच रॅबडॉप्स अक्वाटिकस आणि लाओपेल्टिस कॅलमारिया या सापांच्या जातीही आढळतात. राओरचेस्टेस घाटेई, या बेडकाच्या प्रजातीचा शोधही याच पठारावर लागला होता. चाळकेवाडी पठार हे बिबटे आणि अस्वलाचा भ्रमणमार्ग असून स्थलांतरित तसेच शिकारी पक्ष्यांसाठी आश्रयस्थानाची भूमिकाही बजावते.
मानवी हस्तक्षेपामुळं परिसंस्था धोक्यात : साताऱ्यापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या चाळकेवाडी पठाराचं जैवविविधतेच्या दृष्टीने मोठं महत्त्व आहे. मात्र, वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळं पठारावरील परिसंस्था धोक्यात येत आहे. पठारावरील बहुतांश क्षेत्र हे खासगी मालकीचं आहे. त्यामुळं पावसाळी पर्यटन, लोकांची गर्दी, लाल मातीचं उत्खनन, वाहतूक करणाऱ्या आणि पर्यटकांच्या वाहनांमुळं नैसर्गिक अधिवासाचा नाश होत आहे. परिणामी, किटक, पाली, सापांच्या स्थानिक प्रजाती नष्ट होण्याचा धोका वाढला आहे.
पाच वर्षांनी संशोधनाला यश : इंडोनेशियातील प्रसिद्ध संशोधक डॉ. थसुन अमरसिंघे यांच्या वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील अमूल्य योगदानाचा सन्मान म्हणून पालीच्या नव्या प्रजातीला त्यांचं नाव देण्यात आलं आहे. वन्यजीव शास्त्रज्ञ डॉ. अमित सय्यद, राहुल खोत आणि जयदित्य पुरकायस्थ यांना पाच वर्षांच्या अथक प्रयत्नानं या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात यश आलंय. अमित सय्यद यांनी यापूर्वी भारतातील विविध जंगलांमध्ये संशोधन करून बऱ्याच नवीन प्रजातींचा शोध लावला आहे. त्यातील एक बेडूक, एक विंचू आणि दोन पालींच्या प्रजाती त्यांनी साताऱ्यातून शोधून काढल्या आहेत.
हेही वाचा -
कोल्हापूरात प्रथमत आकर्षक गोल बुबुळाची आढळली पाल, केरळ तामिळनाडूतून आल्याचा अंदाज