पालघर : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणानं संपूर्ण देशाला हादरवून टाकलं होतं. श्रद्धा वालकरचे अनेक तुकडे करुन तिची निर्घृपणे हत्या करण्यात आली होती. २७ वर्षीय श्रद्धा वालकरची १८ मे २०२२ रोजी दिल्लीच्या महरोली परिसरात तिचा प्रियकर आफताब अमीन पुनावाला याने अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती. श्रद्धा आणि तिचा पार्टनर आफताब हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. लेकीच्या हत्येनंतर वडील विकास वालकर तसेच श्रद्धाच्या कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला होता. गेल्या ३ वर्षापासून आपल्या मुलीच्या मृतदेहाचे अवशेष मिळावेत यासाठी विकास वालकर पाठपुरावा करत होते. मात्र, मुलीच्या मृतदेहाच्या अवशेषांवर अंत्यसंस्कार करण्याची वडील विकास वालकर यांची इच्छा अधुरीच राहिली. रविवारी सकाळी विकास वालकरांना हृदयविकाराचा झटका आला. दरम्यान, त्यांना उपचारासाठी वसईच्या कार्डिनल ग्रेशस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे उपचारादरम्यान विकास वालकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती, वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घाडीगावकर यांनी दिली.
अस्थी विसर्जनाची इच्छा अधुरीच : श्रद्धा वालकर ही आपल्या कुंटुबासोबत वसई येथे राहत होती. मात्र, ती २०२२ मध्ये दिल्लीला कामासाठी गेली होती. तिथे तीची आफताबसोबत ओळख झाल्यानंतर ते दोघे भाड्याने घर घेऊन लिव्ह ईनमध्ये राहत होते. आफताबने अमानवी, अतिशय क्रूर आणि माणुसकीला काळीमा फासणारे घृणास्पद अशी श्रद्धाची हत्या केली होती. यामुळं संपूर्ण देश हळहळला होता. श्रद्धाच्या शरीराचे आफताबने 32 तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले होते आणि रात्रीच्या वेळी ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकले होते. मुलीशी संपर्क होत नसल्यामुळं वडील विकास वालकरांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. हत्येच्या घटनेनंतर 6 महिन्यानंतर पोलिसांनी 12 नोव्हेंबर 2022 मध्ये आफताबला अटक केली. तो सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे. मात्र, मुलीच्या निधनाचे वृत्त कळताच विकास वालकर आणि कुंटुबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे दिल्ली पोलिसांकडं होते. ते मिळविण्यासाठी विकास वालकर यांनी मोठा संघर्ष केला. मुलगी गेली मात्र तिच्या मृतदेहाच्या तुकड्यांचे अस्थीविसर्जन करु यासाठी ते पाठपुरावा करत होते. मात्र, रविवारी अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक घाडीगावकर यांनी दिली.
श्रद्धाच्या नावाने चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना : मुलीच्या मृतदेहाचे तुकडे मिळावे यासाठी विकास वालकरांनी दिल्ली पोलिसांशी सतत संपर्कात होते. तसेच निर्भया प्रकरणात जशी चौघांना फाशीची शिक्षा झाली, तशी फाशी श्रद्धाच्या आरोपीला मिळाली पाहिजे, अशी मागणी विकास वालकरांची होती. मला माझ्या मुलीच्या मृतदेहाचे तुकडे द्या, मी त्यावर अंतिम संस्कार करेन, असं वारंवार विकास वालकर म्हणत होते. मात्र, शेवटपर्यंत त्यांना मृतदेहाचे तुकडे देण्यात आले नाहीत. दरम्यान, माझ्या मुलीच्या मृतदेहाचे अवशेष मिळाले नाही तर मी दिल्लीत उपोषण करेन, असा इशाराही विकास वालकरांनी दिला होता. दुसरीकडं श्रद्धाच्या हत्येनंतर मुलींमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी विकास वालकर यांनी "श्रद्धा वालकर चॅरिटेबल ट्रस्ट"ची स्थापना केली होती. या ट्रस्टतर्फे मुलींमध्ये जनजागृती निर्माण करणे, त्यांचे समुपदेशन करणे, हे काम विकास वालकर करत होते. विकास वालकर यांच्या निधनामुळं वसईत शोक व्यक्त करण्यात येत आहे.
ट्रस्टच्या कामाला व्यापक स्वरुप येण्याआधीच निरोप : विकास हे श्रद्धाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करत होते. या खटल्यात २२२ साक्षीदार होते. आरोपीला फाशीवर लटकवण्याअगोदरच आणि श्रद्धा वालकर ट्रस्टच्या कामाचे व्यापक स्वरूप येण्याअगोदरच तिच्या वडिलांचं निधन झालं. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचे खरं कारण समजू शकेल असं पोलिसांनी सांगितलं.
हेही वाचा -