डेहराडून (उत्तराखंड) : उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तसंच माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी आरुषी निशंक फसवणुकीची बळी ठरली आहे. डेहराडून पोलिसांकडं दाखल केलेल्या तक्रारीत आरुषीनं म्हटले आहे की, "चित्रपटात अभिनेत्रीची भूमिका देण्याच्या बहाण्यानं आणि मोठा नफा कमावण्याचं आश्वासन देऊन तिची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली." या प्रकरणी, मुंबईतील दोन निर्मात्यांविरुद्ध डेहराडून सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आरूषीनं केली पोलिसांत तक्रार : माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी आरुषी निशंकनं या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. आरुषी निशंकच्या तक्रारीनुसार, "मुंबईतून आलेल्या दोघांनी स्वतःची ओळख दिग्दर्शक म्हणून करून दिली. तिला सांगितलं की, ते लवकरच एक चित्रपट तयार करणार आहेत. या चित्रपटात आणखी एका अभिनेत्रीचीही प्रमुख भूमिका आहे. जर, आरुषीनं ही भूमिका केली तर, तिला चित्रपटसृष्टीत प्रचंड प्रसिद्धी आणि नफा मिळेल. यावेळी त्या दोघांनी एक अट घातली. ती अट अशी होती की, जर आरुषी तिच्या स्वतःच्या फर्मकडून किंवा तिच्या ओळखीच्या व्यक्तीकडून या चित्रपटात पाच कोटी रुपये गुंतवेल तरच तिला ही भूमिका दिली जाईल." या दोघांनी आरुषीची डेहराडून येथे भेट घेतली होती.
१५ कोटी रुपयांचा नफा देण्याचं आश्वासन दिलं : आरुषी निशंकनं आरोप केला आहे की, "आरोपींनी सांगितलं होतं की, या गुंतवणुकीत तिच्या फर्मला २० टक्के नफा मिळेल. म्हणजेच सुमारे १५ कोटी रुपये. तसंच भूमिकेची पटकथा स्वतःच्या मर्जीनं अंतिम करू शकेल आणि तिच्या समाधानानुसार भूमिका साकारली जाईल." आरोपीनं आरुषीला असंही सांगितलं होतं की, "जर ती तिच्या भूमिकेवर समाधानी नसेल तर, तिचे ५ कोटी रुपये १५ टक्के वार्षिक व्याजासह परत केले जातील."
आरूषीकडून घेतले चार कोटी : आरुषीनं त्यांची अट स्वीकारत प्रस्तावाला मान्यता दिली. यानंतर, ९ ऑक्टोबर २०२४ रोजी आरोपी आणि आरुषी निशंकची फर्म 'हिमश्री फिल्म्स' यांच्यात एक सामंजस्य करार झाला. १० ऑक्टोबर रोजी आरोपींनी २ कोटी रुपये घेतले. काही दिवसांनी सामंजस्य कराराच्या अटींविरुद्ध जाऊन २७ ऑक्टोबर २०२४ रोजी २५ लाख रुपये, ३० ऑक्टोबर रोजी ७५ लाख रुपये आणि १९ नोव्हेंबर रोजी १ कोटी रुपये असे आरुषी निशंकने एकूण ४ कोटी रुपये दिले, असं तिनं तक्रारीत म्हटलं आहे.
फसवणुकीची झाली जाणीव : दोन्ही आरोपींनी मेसेंजरद्वारे सांगितलं की, भारतात या चित्रपटाचं सर्व चित्रीकरण पूर्ण झालंय. आता, उर्वरित चित्रीकरण युरोपमध्ये करायचं आहे आणि आता या चित्रपटात तुमच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली. हा मेसेज येताच आरुषी निशंकला पहिल्यांदा ५ फेब्रुवारी २०२५ रोजी फसवणुकीची जाणीव झाली.
आरुषीला जीवे मारण्याच्या धमक्या : आरुषीच्या तक्रारीनुसार, "दोन्ही चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि चित्रपटाच्या टीमचे बनावट फोटो प्रकाशित आणि प्रसारित केले. या पेजवरुन आरुषीचे फोटो काढून टाकण्यात आले. या सगळ्यानंतर, जेव्हा आरुषीनं तिचे पैसे परत मागितले, तेव्हा दोन्ही आरोपींनी वेगवेगळ्या माध्यमातून तिला जीवे मारण्याची, समाजात तिच्या कुटुंबाची बदनामी करण्याची धमकी दिली. यासोबतच, जर पैसे परत मागितले किंवा आमच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला तर, तुझी बदनामी करू, अशी धमकीही आरोपींनी दिल्याची माहिती आरुषीनं दिली.
दोघांविरूद्धल गु्न्हा दाखल : "आरुषी निशंकच्या तक्रारीवरून मुंबईतील जुहू इथल्या दोन लोकांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत," अशी माहिती कोतवाली नगर प्रभारी चंद्रभान अधिकारी यांनी दिली.
हेही वाचा :