मंदिरे खुली करण्याचा योग्यवेळी घेतलेला निर्णय - जयंत पाटील - मंदिरे खुली जयंत पाटील
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राज्यात सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सोमवारपासून उघडी केली जाणार आहेत. यासाठीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, मंदिरे खुली करण्याचा हा योग्यवेळी घेतलेला निर्णय आहे, असे म्हटले आहे.
आम्ही टप्प्याटप्प्याने राज्यातील अनेक सार्वजनिक ठिकाणे सुरू केली. त्याच पार्श्वभूमीवर या दिवाळीत मंदिर आणि इतर सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील जनतेने मंदिर, मशीद, गुरुद्वारा आदी प्रार्थनास्थळांमध्ये जाताना कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये आणि कोरोनासंदर्भातील असलेल्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केले.
कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन खबरदारी घ्यावी
सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे उघडण्यासाठी सरकारकडून खूप उशीर करण्यात आला, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावर ते म्हणाले की, राज्यात आम्ही टप्प्याटप्प्याने विविध सार्वजनिक ठिकाणे उघडी केली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रार्थना स्थळांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय आम्ही योग्य प्रकारे घेतला आहे. तसेच नागरिकांनी कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन खबरदारी घ्यावी, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.
राज्यातील मंदिरे, चर्च, मशीद, गुरुद्वारे आणि सर्व प्रकारची प्रार्थनास्थळे सोमवारपासून सुरू केली जाणार असून त्यामध्ये कोरोनाचे नियम आणि त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोना पार्श्वभूमी लक्षात घेऊन सर्व खबरदारी नागरिकांनी घ्याव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.