राख रस्त्यावर पडल्याने महिलेने चालकास चांगलेच धुतले
🎬 Watch Now: Feature Video
परळी वैजनाथ (बीड) - तालुक्यातील पांगरी येथे गेल्या अनेक वर्षांपासून राखेची अवैध वाहतूक केली जाते. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून बाहेर पडणारी राख परिसरातील विटभट्ट्यांसाठी वापरली जाते. राख वाहतूक करणारे जवळपास ५०० च्या वर हायवा टिप्पर येथून जातात. या राखेची वाहतूक करत असताना हायवा टिप्पर अवैधरित्या क्षमतेपेक्षा जास्त व काही वेळा उघडी वाहतूक केली जाते. गुरुवारी (ता.२४) सायंकाळी राखेची वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्पर मधून गतीरोधकाजवळ मोठ्या प्रमाणावर राख पडली. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर हवेच्या माध्यमातून प्रदूषण झाले. काही घरात ही राख हवेतून उडून गेली. या सततच्या त्रासाने त्रस्त झालेल्या महिलांनी रस्त्यावर येवून वाहतूक करणारे हायवा टिप्पर अडवले. ड्रायव्हरला चप्पलने चांगलाच चोप दिला. ऐवढ्यावर न थांबता या सर्व ड्रायव्हरला चक्क रस्त्यावर पडलेल्या राखेची साफसफाई करण्यास भाग पडले. यादरम्यान जवळपास १०० च्या वर हायवा टिप्पर अडवून ठेवण्यात आले. ग्रामीण पोलीसांना माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यांच्या कारवाई करण्या ऐवजी पोलीसांनी फक्त दोनशे रुपयांची पावती फाडून टिप्पर सोडू लागल्याने या जमलेल्या महिलांच्या असंतोषाला बळी पडावे लागले. या गाड्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी यावेळी महिलांनी केली.