Thane Crime News: पोलिसांनी चिमुकल्याला पोहोचवले सुखरूप आईच्या खुशीत; अपहरण करून झारखंडमध्ये विक्री करणाऱ्या त्रिकुटाला ठोकल्या बेड्या - अपहरण करून दोन लाखांत विक्री
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे : १५ दिवसांपूर्वी भरदिवसा सहा महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. तपासात चिमुकल्याला दोन लाखात झारखंड राज्यातील नक्षलग्रस्त भागात एका महिलेला विकल्याचे उघडकीस आले आहे. शांतीनगर पोलिसांनी शिताफीने अपहरणकर्त्यांचा शोध घेऊन एका महिलेसह दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या तावडीतून चिमुकल्याची सुखरूप सुटका केली. आरोपींना बेड्या ठोकल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे. अफरोज अबुबकर शेख (वय २५), शंभु सोनाराम साव (वय ५०), आणि मंजुदेवी महेश साव (वय ३४) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना सापळा रचून अटक करण्यात आली. सोमवारी या बाळाला पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी आई शहाना अन्सारी हिच्याकडे सोपविले. माझे बाळ मला परत मिळेल, ही आशा मी सोडून दिली होती. मात्र पोलिसांनी धीर देत माझे बाळ शोधून आज माझ्या हाती सोपवले. भिवंडी पोलिसांचे आमच्यावर लाख लाख उपकार आहेत. त्यांचे मी मनापासून आभार मानते, अशी भावनिक प्रतिक्रिया अपहरण झालेल्या अरबाजची आई शहाना अन्सारी हिने दिली आहे. पोलिस अधिकारी पोलिस कर्मचारी यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.