सोलापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. शेतकऱ्यांसाठी विविध योजना अर्थसंकल्पात नमूद करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारचं पहिलं प्राधान्य देशातील शेतीला आहे, अशी ग्वाही देत निर्मला सीतारमण यांनी विविध घोषणा केल्या आहेत. मात्र या घोषणा आणि योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या काही पचनी पडलेल्या दिसत नाहीत, असंच त्यांच्या प्रतिक्रियांवरुन दिसून येतंय.
बजेट विरोधात शेतकरी नाराजी : कडधान्य, कापूस, भाजीपाला आणि भरडधान्य उत्पादकता वाढवण्याबद्दल, किसान क्रेडिट कार्ड, युरिया खत निर्मिती कारखाने, मखाना बोर्डची स्थापन अशा घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केल्या. परंतु सोलापुरात शेतकऱ्यांनी बजेट विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमधून पांढरा उंदीर दाखवण्याचा प्रयत्न केल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
डाळीसाठी आत्मनिर्भर योजना : निर्मला सीतारमण यांनी डाळीसाठी आत्मनिर्भर योजना आणली. देशाला कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी पुढील ६ वर्षे कडधान्य मिशन राबवलं जाणार असून प्रामुख्याने तूर, उडीद आणि मसूरची शेतकऱ्यांकडून पुढील ४ वर्षे खरेदी करण्यात येईल, अशी घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यावर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
फक्त व्यापारी आणि दलालांचा फायदा : अर्थसंकल्पाविषयी तूर उत्पादक शेतकरी म्हणाले, "ज्यावेळी तुरीची रास असते, त्यावेळी तुरीच्या भावात घसरण केली जाते. अगदी 50 ते 60 रुपये प्रति किलो दराने शेतकऱ्यांकडून तूर खरेदी केली जाते. जिल्ह्यातील डाळीच्या रास संपल्याबरोबर पुन्हा एकदा डाळीचे भाव गगनाला भिडतात. 50 ते 60 रुपयांना विकत घेतलेली तूर बाजारात व्यापारी वर्ग ग्राहकाला 140 ते 150 रुपये प्रतिकिलो दराने विक्री करतात. म्हणजेच शेतकऱ्यांकडून अल्प दरात खरेदी करतात आणि चढ्या दराने बाजारात विक्री करतात. यामध्ये फक्त व्यापारी आणि दलालांचा फायदा होतो".
हेही वाचा -