अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी (1 फेब्रुवारी) 2025-2026 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पावर जेवढी चर्चा होते. तेवढीच सीतारामन यांच्या घातलेल्या पोषाखावर देखील होते. कारण त्या नेहमी वेगवेगळ्या राज्यांच्या पारंपारिक साड्या घालून अर्थसंकल्प सादर करतात.
- केंद्रीय अर्थसंकल्प 2025: निर्मला सीतारामण यांनी सलग 8 व्यांदा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी बिहारच्या मधुबनीच्या पारंपारिक कला प्रकारात तयार केलेली पांढरी साडी परिधान केली. लाल ब्लाउज आणि गोल्डन बॉर्डर असलेली साडी आकर्षनाचे केंद्रबिंदू ठरली. ही साडी निर्मला सीतारामन यांना २०२१ मध्ये पद्मश्री पुरस्कार विजेत्या दुलारी देवी यांनी भेट म्हणून दिली होती आणि अर्थसंकल्पाच्या दिवशी ती घालण्यास सांगितले होते.
- केंद्रीय अर्थसंकल्प 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सहावा केंद्रीय अर्थसंकल्प (अंतरिम अर्थसंकल्प) सादर करतेवेळी त्यांनी निळ्या आणि क्रीम रंगाच्या साडीत आगमन केले. या निळ्या रंगाच्या साडीवर क्रीम रंगाचा 'कांठा स्टिच'चे काम केले होते. कांठा साड्या पारंपारिकपणे पश्चिम बंगाल, ओडिशा आणि त्रिपुरामध्ये आढळतात.
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प 23 जुलै 2024 रोजी सादर झाला. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आलेल्या निर्मला सीतारामन यांनी गुलाबी रंगाचा ब्लाउज आणि गुलाबी बॉर्डर असलेली पांढरी साडी परिधान केली होती. निर्मला सीतारामण यांचे हे सातवे अर्थसंकल्प सादरीकरण होते.
- केंद्रीय अर्थसंकल्प 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या पाचव्या अर्थसंकल्प सादरीकरणासाठी काळ्या बॉर्डरसह आणि सोन्याचं भरतकाम असलेली सिंदूर लाल रेशमी साडी परिधान केली होती. ही साडी कर्नाटकातील धारवाड भागातील हाताने विणलेली 'इलकल' रेशमी साडी आहे. उल्लेखनीय बाबा म्हणजे ही साडी तत्कालीन केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रगलाद जोशी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना भेट म्हणून देण्यात आली होती.
- केंद्रीय अर्थसंकल्प 2022: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या चौथ्या अर्थसंकल्पामध्ये पूर्व भारतातील ओडिशा राज्यातील बोमकाई साडी निवडली. एक अतिशय सुंदर आणि तपकिरी रंगाची साडी, लवचिकता, विश्वासार्हता, सुरक्षिततेचे प्रतीक आहे. ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील बोमकाई गावातील ही हातमागाची साडी आहे.
- केंद्रीय अर्थसंकल्प 2021: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तिसऱ्या अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान तेलंगणाची प्रसिद्ध बोचमपल्ली सिल्क साडी नेसली. भारताच्या रेशीम नगरीच्या वारशाचे प्रतीक असलेली, ही साडी लाल आणि पांढरी रंगाची होती. ज्यामध्ये पांढरे डिझाइन आणि सोनेरी किनार आहे.
- केंद्रीय अर्थसंकल्प 2020: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2020-2021 सादरीकरणात निळ्या रंगाची सिल्कची साडी नेसली. याव्यतिरिक्त, त्यांनी सोन्याची चेन, बांगड्या आणि लहान कानातले घातले. निळा रंग समृद्धीशी निगडित असल्याने, त्या वर्षाची अर्थव्यवस्था समृद्ध होईल याचे प्रतीक आहे.
- केंद्रीय अर्थसंकल्प 2019: 2019 मध्ये, अर्थमंत्री निर्मला सीतारामन गुलाबी मंगलागिरी साडीत आल्या आणि त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. त्यांच्या पहिल्या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणात, अर्थमंत्री लाल बजेट टॅब्लेट (बही गट्टा) घेऊन आल्या होत्या. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील मंगलगिरी येथे या प्रकारची साडी विणली जाते.