Pushtipati Vinayak Jayanti 2023: दगडूशेठ गणपती मंदिरात पुष्टिपती विनायक जयंती मोठ्या उत्साहात साजरी; बाप्पाला 11 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य - Shahale Mahotsav
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये आज पुष्टिपती विनायक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त मंदिरात हा शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या समस्या दूर होण्यासोबत आरोग्यसंपन्न भारताकरीता आणि वैशाख वणव्यापासून सर्वांचे रक्षण व्हावे, याकरिता दगडूशेठ गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करीत शहाळे महोत्सवात ११ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आज सकाळी मंदिरात पूजा, गणेशयाग व अभिषेक झाला. शहाळ्यांची व वृक्षांची नयनरम्य आरास गाभाऱ्यासह सभामंडपात करण्यात आली होती. नंदिनी शंकर, पद्मश्री डॉ. संगीता शंकर, आणि रागिणी शंकर यांचा पहाटे व्हायोलीन वादनाचा कार्यक्रम झाला. वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा पुष्टिपती विनायक हा अवतार झाला होता. वैशाख पौर्णिमेला भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. देशवासियांचे वैशाख वणव्यापासून रक्षण व्हावे. दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतकऱ्यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, या भावनेने शहाळ्यांचा महानैवेद्य दरवर्षी अर्पण करण्यात येतो. तसेच, ट्रस्टतर्फे ससून रुग्णालयातील रुग्णांना दुसऱ्या दिवशी या शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.