Granth Pujan In Kolhapur: कोल्हापुरातील ज्ञानेश्वर मंडपात ग्रंथरुपी 'विठ्ठल', रोज होते नित्यनियमाने पूजा - Granth Pujan
🎬 Watch Now: Feature Video

कोल्हापूर : भारतीय संस्कृती आणि भक्तिसंप्रदायाची दोन मुख्य श्रद्धास्थाने म्हणजे ग्रंथ आणि संत आहेत. संतांचा तत्त्वबोध आपल्यापर्यंत ग्रंथाच्या रूपात पोहोचतो. एका अर्थाने ग्रंथ हेच संतांचे शब्ददर्शन ठरते. कोल्हापुरातील दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या शनिवार पेठेतील ज्ञानेश्वर भजनी मंडपात संतांच्या आणि विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा न करता हस्तलिखित ग्रंथांची नित्य पूजा होते. ग्रंथामधून साकारण्यात आलेली विठ्ठलाची मूर्ती या भजनी मंडपाचे वैशिष्ट्य आहे. चराचरामध्ये आणि माणसा माणसांमध्ये देव आहे अशी संतांची शिकवण संतांनी लिहिलेल्या ग्रंथांमधून अनुभवायला मिळते. जगभरात तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी अशा महिला ग्रंथांचा अभ्यास केला जात आहे. हीच ग्रंथरूपी शक्ती कोल्हापुरातील शनिवार पेठेतील दोनशे वर्ष प्राचीन ज्ञानेश्वर भजनी मंडपात पुराण ग्रंथ, पोथ्या संत साहित्य याचे पूजन केले जाते. विठ्ठलाची भक्ती जोपासली जाते. भजनी मंडपातील सर्व धार्मिक कार्यक्रम हभप वास्कर महाराज यांच्या फडातून केले जातात. मंदिरात असणाऱ्या दुर्मिळ ग्रंथाप्रमाणेच हे प्राचीन मंदिर जुन्या हस्तकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिर प्राचीन असल्यामुळे लाकडी दरवाजा, सागवाणी तुळ्या, जुन्या काळातील बर्गे या ठिकाणी पाहायला मिळतात. संत श्रेष्ठांनी आपल्याला जी शिकवण दिली आहे, त्याचा प्रसार या मंडपातील उपक्रमाच्या माध्यमातून केला जातो. मंदिरात वारकरी संप्रदायाचे पावित्रही जपले जाते, पाच पिढ्यांपासून मंडपाच्या देखरेखीची सेवा केली जात असल्याचे मंडपाचे व्यवस्थापक राजेंद्र माळवदे यांनी सांगितले. मंडपामध्ये उभारलेल्या चबुतऱ्यावर ज्ञानेश्वरी, भगवत गीता, तुकाराम गाथा, संत एकनाथांचे वचन, रामायण, भागवत गाथा यासारखे अनेक ग्रंथ ठेवून त्यांचे पूजन केले जाते. वारकरी संप्रदायाचे पावित्र्य राखून या ठिकाणचे ग्रंथ नियम व अटी घालून वारकऱ्यांना वाचण्यासाठी उपलब्ध करून दिले जातात.