Balasaheb Thackeray Birth Anniversary : बाळासाहेबांना भेटून त्यांना सांगून पक्षाबाहेर पडलो - राज ठाकरे - राज ठाकरेंचे भावनिक वक्तव्य
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण राज्यभरातून भावनिक पडसाद उमटत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
बाळासाहेबांना भेटून पक्षाबाहेर : आपल्या भावना व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले की, जेव्हा बाळासाहेबांना कळले की, मी पक्षातून बाहेर पडत आहे. तेव्हा राज ठाकरेंनी बाळासाहेबांची शेवटची भेट घेतली. तेव्हा त्यांनी राज ठाकरेंना थांबवून हात पसरवून त्यांना मिठी मारली. मग म्हणाले आता जा. ते म्हणतात की मी, बाळासाहेबांना भेटून त्यांना सांगून पक्षाबाहेर पडलो. कोणताही दगाफटका करून, पाठीत खंजीर खूपसून बाहेर पडलेलो नाही. बाहेर पडून इतर कोणत्या पक्षात गेलो नाही, तर तुमच्या विश्वासावर स्वत:चा पक्ष स्थापन केला, असे ते म्हणाले.
बाळासाहेबांचा जीवनप्रवास : बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 साली झाला होता. बाळासाहेब ठाकरे यांचे वडील केशव सीताराम ठाकरे हे सामाजिक कार्यकर्ते तसेच एक पत्रकार देखील होते. त्यांना प्रबोधनकार ठाकरे म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या आईचे नाव रमाबाई होते. एकूण नऊ भावंडांपैकी बाळासाहेब ठाकरे हे सर्वात मोठे होते. प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रस्थानी होते. त्यामुळे मराठी माणसाच्या हक्कासाठी लढण्याचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले होते.
पत्रकार म्हणून कारकिर्द : पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात बाळासाहेब ठाकरे यांनी फ्री प्रेस जनरल या इंग्रजी वृत्तपत्रातून व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी पहिल्यांदा नोकरी मिळवली. यासोबतच टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रामध्ये देखील त्यांनी काढलेले व्यंगचित्र प्रसिद्ध होत होते. 13 जून 1948 ला बाळासाहेब ठाकरे यांचं लग्न मीनाताई ठाकरे यांच्याशी झाले. नोकरीमध्ये त्यांना रस वाटत नव्हता म्हणून 1960 साली त्यांनी आपले स्वतःचे मार्मिक हे साप्ताहिक सुरु केले. मार्मिकच्या माध्यमातून महाराष्ट्रातले आणि मराठी माणसाचे प्रश्न त्यांनी समोर आणण्याची सुरुवात केली. महाराष्ट्रात त्यावेळी वाढणारी गैर मराठी लोकांची लुडबुड यावर भाष्य करणारी व्यंगचित्र त्यांनी मार्मिक मधून प्रसिद्ध केली होती.
बाळासाहेब ठाकरेंचे वादग्रस्त वक्तव्य : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बाळासाहेब ठाकरे नेहमीच चर्चेत असायचे. अशाच एका वादग्रस्त वक्तव्यामुळे निवडणूक आयोगाने बाळासाहेब ठाकरे यांच्यावर मतदानासाठी थेट सहा वर्षाची बंदी आणली होती. 11 डिसेंबर 1999 ते 10 डिसेंबर 2005 या काळात बाळासाहेबांवर मतदानासाठीची बंदी होती. 17 नोव्हेंबर 2012 साली बाळासाहेब ठाकरे हे अनंतात विलीन झाले. हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरवणारा होता.
हेही वाचा : Balasaheb Thackeray Jayanti : मराठी माणसाच्या न्याय हक्काचा बुलंद आवाज म्हणजे 'बाळासाहेब ठाकरे'