पालघर : जिल्ह्यात कालबाह्य खते विक्री प्रकरण ‘ईटीव्ही भारत’नं उचलून धरल्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयानं या प्रकरणाची चौकशी करून बोईसर येथील कृषी खत निविष्ठा केंद्राचा परवाना पुढील आदेश होईपर्यंत रद्द केलाय. परंतु, शेतकऱ्यांच्या भावनांशी आणि पिकांशी खेळणाऱ्या खत, औषधे आणि कीटकनाशके विक्रेत्यांना पाठीशी न घालता त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
मुदतबाह्य खते विक्रीचे अनेक प्रकार : पालघर जिल्ह्यात यापूर्वी खतांच्या गैरवापराचे तसेच काळ्या बाजारात खतांच्या विक्रीचे अनेक प्रकार घडले होते. ‘ईटीव्ही भारत’नं या सर्व प्रकारांवर आवाज उठवला. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय तसेच गुण नियंत्रण विभाग खत विक्रीतील गैरप्रकारांकडं कशाप्रकारे दुर्लक्ष करत आहे, यावर आवाज उठवण्यात आला. मुदतबाह्य खते, कीटकनाशके आणि औषधे विकून खत विक्रेते मोठ्या प्रमाणात नफा कमवतात. मात्र, त्याचवेळी अशा मुदतबाह्य खत, औषधे आणि कीटकनाशकांच्या वापरामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, अशी प्रतिक्रिया स्थानिक शेतकऱयांनी दिली.
युरियाचा गैरवापर : पालघर जिल्ह्यात यापूर्वी युरियाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात होता. शेतीसाठी असलेला युरिया औद्योगिक वापरासाठी जात होता. एकीकडं राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे. तसेच खतावर अनुदान देत असताना, खत विक्रेते मात्र राज्य आणि केंद्र सरकारच्या उद्दिष्टांना आपल्या कृतीतून हरताळ फासत आहेत, असा आरोप काही सामाजिक संघटनांनी केला.
मांडवली करण्यास नकार : हितेंद्र राऊळ यांनी मिरचीच्या शेतीसाठी घेतलेले खत मुदत संपलेले होते. मिरचीच्या शेतीत हे खत टाकल्यानंतर त्याचा फायदा होण्याऐवजी तोटा झाला. त्यानंतर राऊळ यांनी खतांची गोणी, बिल आणि त्यावरील मुदत पाहिल्यानंतर मुदतबाह्य खत आपल्या माथी मारल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी खताची गोणी, पावतीसह जिल्हा आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांकडं तक्रार केली. तक्रारीची सुरुवातीला गांभीर्यानं दखल घेतली नाही, परंतु ‘ईटीव्ही भारत'नं याबाबत आवाज उठवला. तसेच खतविक्रेता फत्तेचंद जैन यांच्यासोबत मांडवली करण्याचा प्रस्ताव हितेंद्र राऊळ यांनी नाकारला.
चौकशीत मुदतबाह्य खते विकल्याचं उघड : राऊळ यांनी जिल्हा कृषी अधीक्षक तसेच जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांकडं तक्रार केली. त्यावर गुणनियंत्रण विभागानं चौकशी केली आणि संबंधितांना म्हणणं मांडण्याची संधी दिली. त्यानुसार चौकशीत संबंधित विक्रेते रवी जैन यांनी कामगाराच्या चुकीमुळं राऊळ यांना मुदतबाह्य औषधे आणि खत दिल्याचं मान्य केलं. राऊळ यांच्या तक्रारीनुसार, हा प्रकार उघडकीस आला असला तरी, पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी खते, बी-बियाणे, कीटकनाशके यांची बेकायदेशीर विक्री होत असते. तसेच मुदतबाह्य औषधांची विक्री होते. कधी कधी बनावट औषधे, खते, बी बियाणे दुकानातून विकली जातात. यावर वास्तविक कृषी विभागाचे नियंत्रण असायला हवं. परंतु, कृषी विभाग फारशा गांभीर्याने या प्रकरणाची दखल घेत नाही. अशा मुदतबाह्य तसेच बनावट औषधांमुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असेल तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
"शेती तोट्यात असताना शेतकरी उत्पादन घेत असतो. त्यासाठी खते, बी बियाणे, कीटकनाशके मोठ्या प्रमाणात वापरतो. परंतु मुदतबाह्य आणि बोगस खते, बी बियाणे, कीटकनाशके यांची विक्री झाली, तर संबंधित दुकानदारावर तात्पुरता परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाते. त्यातून काहीच साध्य होत नाही. अशा प्रकारचे बोगस बी बियाणे, खते तसेच मुदतबाह्य खते विकणाऱ्यांवर जरब बसण्यासाठी त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द होण्याची आवश्यकता आहे.- हितेंद्र राऊळ, शेतकरी
परवाना अनिश्चित काळासाठी रद्द : जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर यांनी खत नियंत्रण आदेश १९८५ चे खंड क्रमांक २६ अन्वये त्यांना मिळालेल्या अधिकारानुसार, फत्तेचंद जैन यांचा खत विक्री परवाना रद्द करण्यात आलाय. पुढील आदेश येईपर्यंत हा परवाना रद्द झाला. अशा प्रकारच्या खत विक्रेत्यांना जरब बसावी, म्हणून परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी आता होत आहे.
हेही वाचा -