बैलगाडीवरील शर्यत बंदी उठवा... सांगली ते मुंबई पदयात्रेला सुरुवात - bull race taradition
बैलगाडीवरील शर्यत बंदी उठवावी या मागणीसाठी सांगली ते मुंबई बैलगाडी ओढत पदयात्रा निघाली आहे. सामजिक कार्यकर्ते विजय जाधव यांनी हे यात्रा सुरू केली आहे.
सांगली - बैलगाडीवरील शर्यत बंदी उठवावी या मागणीसाठी सांगली ते मुंबई बैलगाडी ओढत पदयात्रा निघाली आहे. सामजिक कार्यकर्ते विजय जाधव यांनी हे यात्रा सुरू केली आहे. बैलगाडीत प्रतिकात्मक बैलाची अंत्ययात्रा घेऊन जाधव हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री'वर धडक देणार आहेत. ते अनवाणी रस्ता कापत आहेत. हिवाळी अधिवेशनात बैलगाडी शर्यतीला मंजुरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केलीय.
सांगली ते मुंबई बैलगाडीसह पदयात्रा
राज्यात गेल्या 8 वर्षांपासून बैलगाडी शर्यतीवर बंदी आहे. विविध शेतकरी संघटना बैलगाडीवरील शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी मागणी करत आहेत. मात्र सरकारकडून या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या मागण्यांबाबत सांगलीच्या इस्लामपूरमधील सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव हे सुद्धा वारंवार मागणी करत आहेत. 4 वर्षांपूर्वी जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी ठाकरे यांनी सेनेचे सरकार आल्यावर बैलगाडी शर्यतीला परवानगी देऊ,असा शब्द दिला होता. याच वेळी जाधव यांनी बैलगाडीला परवानगी मिळेपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, असे ठरवले होते.
मुख्यमंत्री साहेब... दिलेला शब्द पाळा!
आता उद्धव ठाकरे यांनी त्यांचा शब्द पाळावा, अशी मागणी जाधव यांनी केली आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी जाधव यांनी सांगली ते मुंबई बैलगाडी पदयात्रा दिवाळीच्या दिवशी सुरू केली आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयापासून त्यांनी बैलगाडी पदयात्रा सुरू झाली. ते बैलगाडी ओढत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील मातोश्री निवासस्थानाकडे निघाले आहेत. बैलांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा घेऊन जाधव यांनी ही पदयात्रा काढली. येत्या हिवाळी अधिवेशनात बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवावी, देशी गायी खरेदीसाठी सबसिडी देण्यात यावी, अशी मागणी विजय जाधव यांनी केली आहे. 24 नोव्हेंबर रोजी जाधव मातोश्रीवर धडकणार आहेत.