छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : नायलॉन मांजामुळं अनेक ठिकाणी अपघात होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळं यावर उपाय म्हणून छत्रपती संभाजीनगरातील एका बांबू व्यावसायिकानं भन्नाट जुगाड केलाय.
एका बांबूच्या छोट्या काडीच्या मदतीनं दुचाकीच्या हँडलवर एक कमान तयार करून देत व्यावसायिकानं मांजामुळं चालकाच्या जीविताला होणारा धोका टाळण्याचा प्रयत्न केलाय. विशेष म्हणजे नायलॉन मांजाची विक्री होत असलेल्या ठिकाणी अगदी मोफत सेवा देण्याचे काम करत आहे. शीतल कपूर असं या व्यावसायिकाचं नाव आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी पाचशेहून अधिक नागरिकांना मोफत सेवा दिलीय. पतंग उडवण्याचा काळ संपेपर्यंत ही सेवा देत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
अशी सुचली कल्पना : शहरातील सर्वात जुना परिसर म्हणजे राजाबजार आहे. या भागात पतंग विक्रीची अनेक दुकानं आहेत. त्यामुळं इथं नायलॉन मांजाची विक्रीही केली जाते. संक्रातीच्या काळात मोठ्या प्रमाणात पतंग उडवले जातात. मात्र, या दरम्यान नायलॉन मांजा सर्रास वापरल्या जात असल्यानं दुचाकीस्वारांच्या जीवाला धोका निर्माण होतो. तसंच या मांजामुळं अनेक ठिकाणी अपघाताच्या घटनादेखील घडतात. त्यामुळं यावर उपाय म्हणून आपल्याकडं असलेल्या बांबूच्या काड्यांचा वापर होऊ शकतो, अशी कल्पना बांबू व्यावसायिक शीतल कपूर यांना सुचली. त्यानुसार त्यांनी यावर काम सुरू केले.
आपल्यापासूनच केली सुरुवात : शीतल कपूर यांनी बांबूच्या काडीचा वापर करत सर्वप्रथम स्वतःच्या दुचाकीसाठी एक कमान तयार केली. दुचाकीला असलेल्या दोन आरश्यांच्या सहाय्यानं ही कमान बांधण्यात आली. या कमानीमुळं समोर मांजा आल्यास तो आपोआप दुचाकीस्वारांना इजा न करता बाजूला सारला जाईल. या कमानीचा प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर त्यांनी हा प्रयोग इतरांना सांगितला. सुरुवातीला ओळखीच्या लोकांच्या दुचाकीसाठी त्यांनी कमान तयार करून दिली. त्यानंतर त्यांनी प्रत्येक नागरिकांना मोफत सेवा देण्यास सुरुवात केली. रोज किमान 20 ते 30 दुचाकीस्वारांना ही मोफत सेवा देत आहेत. मागील काही दिवसात पाचशेहून अधिक लोकांना मोफत कमान बसवून दिल्याची माहिती शीतल कपूर यांनी दिली. "या सुविधेमुळं एका व्यक्तीचा जरी जीव वाचला तरी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल," असं मत शीतल कपूर यांनी व्यक्त केलंय.
दुचाकीस्वारांनी केला आनंद व्यक्त : राजाबाजार येथे राहणारे ठोले यांचे या कमानीमुळं थोडक्यात प्राण बचावले. त्यांनी सांगितलं की, ते दुचाकीवरुन जात असताना अचानक त्यांच्यासमोर मांजा आला. मात्र, त्यांनी त्यांच्या दुचाकीला कमान लावल्यामुळं मांजा डोळ्याच्या बाजूनं निघून गेला. अन्यथा मांजामुळं गळा चिरला असता. तर शीतल कपूर यांच्या या सेवेमुळं नक्कीच एखाद्याचा जीव वाचू शकतो. मांजापासून वाचण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पण, मांजाची विक्री होऊ नये, याकरिता पोलीस आणि जिल्हाप्रशासानानं मांजा तयार करणाऱ्यांवर आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
हेही वाचा -