मुंबई : चीनमध्ये एचएमपीव्ही HMPV (ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस) व्हायरसने धुमाकूळ घातल्यानं जगभरात कोरोना सारख्या आजाराची भीती नागरिकांमध्ये निर्माण झालीय. देशात बंगळुरु येथे दोन जणांना एचएमपीव्हीची लागण झाल्याचं वृत्त आल्यानं देशभरात खळबळ उडाली आहे. त्यामुळं हा नेमका काय आजार आहे, याची लक्षणे काय, त्यापासून वाचण्यासाठी काय करावं लागेल, आहारात कशाचा समावेश करावा लागेल याबाबत आरोग्य तज्ञांनी माहिती दिली आहे.
HMPV मुळं घाबरून जाण्याची गरज नाही : आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी महाराष्ट्रातील उपसंचालक, सिव्हिल सर्जन आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सर्दी, खोकला, एसएआरआय आणि आयएलआय प्रकरणांचे सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. एचएमपीव्हीमुळं घाबरून जाण्याची गरज नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भीतीचं वातावरण निर्माण करण्याची गरज नाही. चीनमध्ये आढळून आलेला विषाणू एचएमपीव्ही अहवालाबाबत चिंतेचं कारण नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण करुन २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही, असं स्पष्ट केलंय. मात्र, खबरदारीचा भाग म्हणून नागरिकांनी श्वसनांच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, यासंदर्भातील सूचनाचं पालन करण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय. एचएमपीव्हीबाबत राज्य सरकार गंभीर असून यापासून लढण्यासाठी राज्याची आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. याबाबत आरोग्य विभागातर्फे बैठक घेण्यात येणार आहे.
आरोग्य विभागाची होणार बैठक : एचएमपीव्हीमुळं कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही, नागरिकांना स्वतःची काळजी घेण्याबाबतच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे त्याचं पालन करावं. संसर्गजन्य आजाराबाबतच्या मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाने जारी केल्या आहेत. त्याचं काटेकोरपणे पालन नागरिकांनी करावं असं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलंय. कोरोना सारख्या मोठ्या आजाराला याच आरोग्य विभागाने परतवून लावलं होतं, अफवावर विश्वास न ठेवता आरोग्य विभागाच्या सुचनांकडं महत्त्व द्या. मुख्यमंत्री आणि आरोग्य विभाग सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असं आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले.
(एचएमपीव्ही) बाबत आरोग्य तज्ज्ञांचं काय मत? : याबाबत मुंबईतील सैफी हॉस्पिटलच्या बाल श्वसन संक्रमण विशेषज्ञ डॉ. जहाबिया एम. बगवाला यांनी याबाबत मार्गदर्शन केलं. एचएमपीव्ही सारख्या श्वसनाच्या विषाणूजन्य आजारांना प्रतिबंधित करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आहाराचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. योग्य आहारामुळं प्रतिकारशक्ती मजबूत होऊन शरीराला संसर्गाचा प्रतिकार करण्यास मदत होते. यासंदर्भात मायक्रो बायोलॉजी सोसायटी, इंडियाचे अध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, या विषाणूमुळे घाबरुन जाण्याची अजिबात गरज नाही. यामुळे मृत्यू होत नाही. तसंच हा किरकोळ विषाणू आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही असं देशमुख यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं.
प्रतिकारशक्ती वाढवणारे पोषक घटक : प्रतिबंधक उपायांमध्ये अँटी ऑक्सिडंट्सयुक्त आहार असावा. संत्री, मोसंबी, लिंबू यांसारखी फळे, ब्रोकली, फ्लॉवर आणि पालेभाज्या यातून व्हिटॅमिन 'सी' आणि 'ई' मोठ्या प्रमाणात मिळतात. अशा फळांचा, भाज्यांचा आहारात समावेश करण्याची गरज आहे. झिंक श्वसन संसर्गांशी लढण्यात उपयुक्त ठरतो. त्यामुळं शेंगदाणे, काजू, डाळी आणि ओट्स या झिंक समृद्ध पदार्थांचा आहारात समावेश करावा. प्रोटीनचा पुरेशा प्रमाणात समावेश करावा. अंडी, दूध, मसूर, कडधान्य आणि सत्वयुक्त दहीचा आहारात समावेश करणं महत्त्वाचं आहे. याद्वारे प्रोटीन मिळू शकेल. प्रोटीन शरीराची पुनर्बांधणी तसंच इन्फेक्शनशी लढायला आवश्यक एंझाईम आणि इम्युनोग्लोब्युलिन्स तयार करायला मदत करते.
पाणी पिण्याचे महत्त्व : हायड्रेशन शरीराला व्हायरल संसर्गाशी लढायला सक्षम करते. पाण्याचा नियमित पुरवठा म्यूकस थर चांगला ठेवतो, जो श्वसन मार्गांची संरक्षणात्मक थर म्हणून काम करतो. त्यामुळं पाणी प्या.
आहारातून होणारा प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक पुरवठा - दही, ताक आणि पनीर यासारख्या प्रोबायोटिक पदार्थांमुळं आंतरिक बॅक्टेरिया संतुलित ठेवले जातात, जे प्रतिकारशक्तीसाठी उपयुक्त असतात. त्यामुळं यांचा आहारात समावेश करा.
प्रोसेस्ड अन्न टाळावे : शक्य असल्यास, साखरेचे किंवा प्रोसेस्ड पदार्थ कमी खाल्ले पाहिजेत. हे पदार्थ इम्यून रिस्पॉन्स कमजोर करू शकतात. सर्वसमावेशक आणि पोषक आहार केवळ एचएमपीव्ही सारख्या आजारांपासून संरक्षण करत नाही तर शरीराला त्याच्या लक्षणांशी लढण्याची ताकद देतो. योग्य आहाराच्या जोडीला स्वच्छता व निरोगी जीवनशैली स्वीकारणे गरजेचे आहे.
ह्युमन मेटापनेमोव्हायरस (एचएमपीव्ही) : चीनमध्ये अज्ञात कारणांनी होणाऱ्या न्यूमोनिया आणि इतर श्वसन आजारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यात मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया, इन्फ्लुएंझा ए आणि ह्युमन मेटापनेमोव्हायरस एचएमपीव्ही सारखे विविध घटक आढळले आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांनी अशा रुग्णांच्या ओळखीसाठी आणि वर्गीकरणासाठी एका पद्धतीची सुरुवात केली आहे.
जग आणि भारतासाठी याचा काय अर्थ आहे? : राज्यात एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही. एचएमपीव्हीची साथ विशिष्ट भागापुरती मर्यादित राहते. हा व्हायरस प्रामुख्याने थंडीत रेस्पिरेटरी सिंक्टीशियल व्हायरस (आरएसव्ही) सोबत दिसून येतो.
एचएमपीव्ही म्हणजे काय? : एचएमपीव्ही हा एक श्वसन संसर्गजन्य आजार असून, तो वरचा आणि खालचा श्वसन मार्ग प्रभावित करतो. हा प्रामुख्याने लहान मुले, वयोवृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना प्रभावित करतो. 5 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 90 टक्के लोकांमध्ये एचएमपीव्ही संसर्गाचे पुरावे सापडतात, तर 3 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या 90 टक्के बाळांमध्ये एचएमपीव्ही अँटीबॉडीज आढळतात.
एचएमपीव्हीची लक्षणे आणि उपचार : एचएमपीव्ही मध्ये ताप, खोकला, सर्दी आणि श्वसनास त्रास होणे अशी लक्षणे दिसतात. हा श्वसन थेंबांमुळं किंवा दूषित पृष्ठभागांच्या संपर्कातून पसरतो. हा संसर्ग सौम्य फ्लूसारखा असतो किंवा तीव्र स्वरूप घेऊ शकतो, जसं की श्वास घेताना त्रास होणे, ऑक्सिजनची कमतरता, किंवा दमा वाढणे. यासाठी कोणतेही विशिष्ट औषध उपलब्ध नाही. उपचार मुख्यतः लक्षणांवर आधारित असतो.
"20 सेकंदांपर्यंत साबणाने आणि पाण्याने हात धुवावे, आजारी लोकांच्या संपर्कात येणे टाळावे, न धुतलेल्या हातांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळावे, खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाकावे, आजारी असल्यास घरात रहावे, दरवाज्यांचे हॅन्डल्स, टेबल्स सारख्या पृष्ठभागांची स्वच्छता नियमितपणे करावे." - डॉ. जहाबिया एम. बगवाला, बाल श्वसन संक्रमण विशेषज्ञ
मुंबई, पुण्यात रुग्ण नाहीत : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एचएमपीव्ही बाधित कोणताही रूग्ण आढळलेला नाही. नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असं आवाहन आरोग्य सेवा संचालनालयाने केलं आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या मानवी ‘मेटान्यूमोव्हायरस’ (एचएमपीव्ही ) या विषाणूच्या साथ उद्रेकाबाबत आरोग्य सेवा संचालनालय, पुणे यांनी याबाबत एक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत, याबाबतची माहिती मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात असा एचएमपीव्ही बाधित कोणताही रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. तथापि, नागरिकांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावं, असंही आवाहन महापालिकेने केलं आहे.
काय आहे एचएमपीव्ही ? : मानवी मेटापन्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही ) तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. मानवी मेटान्यूमोव्हायरस (एच.एम.पी.व्ही) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. ज्यामुळं श्वसनमार्गाच्यावरील भागातील संसर्गास (सर्दीसारख्या) कारणीभूत ठरते. हा एक हंगामी रोग आहे, जो सामान्यतः आर.एस.व्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडस् मध्ये वर्ष 2001 मध्ये आढळला होता. या अनुषंगाने आरोग्य सेवा महासंचालनालय (डी.जी.एच.एस) आणि संचालक, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एन.सी.डी.सी दिल्ली) यांनी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
हे उपाय करा-
● जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे.
● साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवावेत.
● ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहावे.
● भरपूर पाणी प्यावे आणि पौष्टिक खावे.
● संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुवीजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्यावी.
हे करू नये-
● हस्तांदोलन.
● टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर.
● आजारी लोकांशी जवळचा संपर्क.
● डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे.
● सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.
● डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे.
हेही वाचा -
एचएमपीव्ही विषाणू जुनाच असल्यानं घाबरू नये, दोन रुग्ण कर्नाटकात आढळल्यानंतर डॉक्टरांची पोस्ट चर्चेत