मुंबई - मतदान होईपर्यंत राजा असलेल्या मतदारांना मतदानानंतर मात्र हेटाळणी स्वीकारावी लागत असल्याचं अनेकदा समोर येतं. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या वक्तव्यामुळं पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, सालगडी कराल का मला असं वक्तव्य अजित पवारांनी केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांची विनवणी करणाऱ्या अजित पवारांनी आता हा पवित्रा घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अजित पवारांच्या या बदलत्या भूमिकेवर मतदारांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
मतदार हाच राजा - भारतीय संविधानाने प्रत्येक मतदाराला मतदानासाठी समान अधिकार दिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात मतदार हाच राजा असतो. मात्र एकदा उमेदवार विजयी झाल्यानंतर मतदारांना बाजूला सारले जात असल्याचं दिसून येतं. अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला विधानसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्यानं त्याचा परिणाम अजित पवारांच्या वागण्यात दिसू लागलाय का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागल्यानं राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना धास्ती वाटत होती. मात्र विधानसभा निवडणुकीत तब्बल ४१ जागांवर विजय मिळवल्यानं राष्ट्रवादीच्या नेत्यांची कॉलर टाईट झाली. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ रायगडची एकमेव जागा जिंकता आली होती. त्या तुलनेत विधानसभेला मोठा विजय मिळाल्यानं राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांनी मतदारांना आपलंसं करण्यासाठी त्यांची माफी मागितली होती, आपल्याला साथ द्या, असं आवाहन केलं होतं. मात्र आता सत्ता मिळाल्यानंतर त्यांचा पवित्रा बदलला की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याबाबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय चोरमारे म्हणाले, अजित पवारांचा स्वभाव असा नाही. मात्र गेल्या काही काळापासून धनंजय मुंडे प्रकरणाचा दबाव त्यांच्यावर आहे. मतदारांना उध्दटपणे बोलणे हा त्यांचा स्वभाव नाही. त्यांच्यावर असलेल्या ताणामुळे त्यांचा बोलताना तोल सुटला असावा. सध्याच्या परिस्थितीत त्यांच्यावर मोठा राजकीय दबाव आहे. संविधानाने मतदाराला लोकशाहीत अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले आहे. त्यामुळे असे प्रकार होणे चुकीचेच आहे. अशी भाषा वापरणे अत्यंत चुकीचे आहे.
हेही वाचा...