पुणे - संभाजी ब्रिगेडने गड-किल्ले लग्नसमारंभासाठी देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे. मंत्रिमंडळाचा हा निर्णय निषेधार्ह आणि दुदैवी असल्याचे सांगत गड- किल्यांवर लग्नसमारंभ होणार असेल तर शिवप्रेमी शांत बसणार नाहीत. महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या गड-किल्ल्यांवर लग्न आणि इतर समारंभ होणार असतील तर ते उधळून दिल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यानी दिला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या ३ सप्टेंबरच्या निर्णयानुसार पर्यटन विकास महामंडळाला भाडेपट्ट्याने मंजूर केलेल्या सरकारी जमिनींबाबत नवीन धोरण ठरवण्यात आले आहे. त्यानुसार या महामंडळाकडे असणाऱ्या जमिनी खाजगी डेव्हलपर्सच्या माध्यमातून डेव्हलप करण्यासाठी ३०, ६० किंवा ९० वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये संरक्षित स्मारकाच्या यादीत नसणाऱ्या आणि राज्य सरकारच्या ताब्यातील गडकिल्ल्यांचाही समावेश करण्यात आला आहे.