मुंबई : अँटिलिया आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासात दररोज नवनव्या बाबी समोर येत आहेत. या प्रकरणी अटकेत असलेल्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेची दोघांचा एन्काऊंटर करण्याची योजना होती अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे आणखीन काय खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दोघांच्या एन्काऊंटरची योजना
वाझे काहीतरी मोठं करण्याच्या प्रयत्नात असल्याचे एनआयएने कोर्टात सांगितले होते. हे काहीतरी मोठं म्हणजेच दोघांचा एन्काऊंटर वाझे करणार होता असे सूत्रांनी सांगितले आहे. वाझे ज्या दोघांचा एन्काऊंटर करणार होता त्यापैकी एक व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून वाझेच्या घरी ज्या व्यक्तीचा पासपोर्ट आढळून आला होता तीच व्यक्ती असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
म्हणून नावाबाबत गुप्तता
या संपूर्ण प्रकरणात ज्या व्यक्तीचा पासपोर्ट वाझेच्या घरी सापडला. त्या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून संबधित व्यक्तीच्या नावाबाबत गुप्तता बाळगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
औरंगाबादेतील त्या कारमध्ये एन्काऊंटरची योजना
औरंगाबादेतून नोव्हेंबर 2020 मध्ये चोरी झालेल्या इको कारमध्ये हा एन्काऊंटर करण्याचा वाझेचा कट होता अशी माहितीही मिळत आहे. याच गाडीची नंबर प्लेट शोधमोहिमे दरम्यान CIU च्या पथकाला मिळाली होती. एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 नोव्हेंबर 2020 रोजी औरंगाबाद येथून चोरीला गेलेल्या ईको कारमध्ये दोन लोकांचा एन्काऊंटर करून, तो एन्काऊंटर झाल्यानंतर अँटिलिया जवळील कारमधील स्फोटकांचे प्रकरण उघडकीस आणल्याचे जाहीर करून शाबासकी मिळवण्याची योजना होती. या कटानुसार दोघांचा एन्काऊंटर केला जाणार होता.
मिठी नदीत सापडली होती नंबर प्लेट
एनआयएचे पथक बीकेसी येथील मिठी नदीत वाझे यांनी फेकलेल्या पुराव्यांचा शोध घेत असताना एनआयएला एका कारची नंबर प्लेट सापडली होती. याशिवाय एनआयएच्या तपासात वाझेच्या घरातून 62 पिस्तुलीच्या गोळ्या देखील सापडल्या होत्या. याची माहिती एनआयएनं कोर्टात दिली होती. तर पोलीस दलाकडून वाझेला 30 गोळ्या देण्यात आल्या होत्या. त्यापैकी 5 गोळ्या झडतीत सापडल्या असून इतर गोळ्यांचा शोध घेतला जात आहे. याच नोंद नसलेल्या गोळ्यांच्या मदतीने वाझे दोघांचा एन्काऊंटर करणार असल्याचा संशय एनआयएला असून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे.