BMC School : पालिका शाळांना नवा साज देण्याचे काम सुरूच - बीएमसी शाळांना रंगरंगोटी सुरू
मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येतो. कोरोनामुळे दोन वर्षे शाळा बंद होत्या. दोन वर्षानंतर शाळा सुरु झाल्या आहेत. खासगी शाळांचा सामना करण्यासाठी पालिकेच्या शाळांना नवा साज दिला जात आहे.
मुंबई - मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येतो. कोरोनामुळे दोन वर्षे शाळा बंद होत्या. दोन वर्षानंतर शाळा सुरु झाल्या आहेत. खासगी शाळांचा सामना करण्यासाठी पालिकेच्या शाळांना नवा साज दिला जात आहे. कोरोनामुळे गेले दोन वर्षे शाळा बंद असल्या तरी हे काम सुरु होते. शाळांना नवा साज दिल्याने विद्यार्थी संख्येत वाढ होत असल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
पालिकेच्या शाळा कात टाकतायत - मुंबई महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. नागरिकांना मूलभूत गरजा पुरवणे त्याचसह शिक्षण आणि आरोग्य सुविधा पुरवणे हे पालिकेचे बंधनकारक कर्तव्य आहे. पालिकेच्या नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सुमारे १,१५० शाळा असून स्वतःच्या मालकीच्या ४६७ शालेय इमारती आहेत. यात ३ लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालिका शाळांची अवस्था आणि देण्यात येणारे शिक्षण यामुळे गेल्या काही वर्षापर्यंत शिक्षणाचा दर्जा घसरला होता. मात्र त्यानंतर पालिकेने दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिले. पालकांचा आणि विद्यार्थ्यांना ओढा इंग्रजी शाळांकडे असल्याने पालिकेच्या शाळेकडे वळवण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु केल्या. सी.बी.एस.ई., आय.सी.एस.ई, आयबी बोर्डाच्या शाळा सुरु केल्या आहेत. त्याला पालक आणि विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
पालिका शाळांना नवा साज - पालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या शाळा मिळाव्यात यासाठी शालेय इमारतींच्या मोठ्या दुरुस्त्या, दर्जोन्नती आणि पुनर्बांधणी केली जात आहे. पालिकेच्या शाळांचे 'मुंबई पब्लिक स्कुल' असे नामकरण करण्यात आले आहे. सर्व शाळांना एकच रंग देण्यात येत आहे. शाळांवर पालिकेचे लोगो लावण्यात येत आहेत. २०२१ पासून किरकोळ व तात्काळ दुरुस्तीसाठी २ वर्षांसाठी सात झोनमध्ये कंत्राटदार नियुक्त केले आहेत. त्यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शाळांच्या मोठ्या दुरुस्तीसाठी ६८ कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामधील २७ कामे चालू आर्थिक वर्षात तर ४१ कामे पुढील आर्थिक वर्षात केली जाणार आहेत. शाळांच्या पुनर्बांधणीची ३५ कामे प्रगतीपथावर असून ३२ कामे पुढील वर्षी केली जाणार आहेत. शाळांच्या दुरुस्त्या, दर्जोन्नती आणि पुनर्बांधणी यासाठी पालिकेने ४१९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांना या सुविधा - महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये एकसूत्रता यावी, सर्व शाळांचा सामाजिक दर्जा एकसमान गुणवत्तापूर्ण रहावा, याकरिता सर्व शाळा आता ‘मुंबई पब्लिक स्कूल’ या नावाने ओळखल्या जात आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती अशा ८ भाषिक माध्यमांच्या शाळा संचालित केल्या जातात. नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सुमारे १,१५० शाळांमध्ये मिळून सद्यस्थितीत ३ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे शिक्षण दिले जाते. दप्तराचे ओझे कमी व्हावे म्हणून टॅबद्वारे शिक्षण उपक्रम सुरु करण्यात आला आहे. वर्गखोल्या (क्लासरूम) डिजिटल केल्या जात आहेत.
अन्य बोर्डाच्या शाळा - अन्य बोर्डातील शाळांकडे पालकांचा वाढता कल विचारात घेऊन महानगरपालिकेने सी.बी.एस.ई. बोर्डच्या ११, आय.सी.एस.ई. बोर्डची १ शाळा सुरु केली आहे. या शाळांना दिल्ली बोर्डाची संलग्नता प्राप्त झाली आहे. जागतिकीकरणाच्या स्पर्धेत महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी आय. बी. (I. B. - International Baccalaureate) बोर्डची शाळा सुरू करण्यात आली आहे. त्यासोबतच, माटुंगा येथील एल. के. वाघजी महानगरपालिका शालेय इमारतीमध्ये केंब्रिज विद्यापीठाशी संलग्नीत आय.जी.सी.एस.ई. (IGCSE - International General Certificate of Secondary Education ) बोर्डची शाळा सुरू केली जाणार आहे.
कोरोनाची काळजी -मुंबईमधील शाळा दोन वर्षानंतर सुरु झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षात बहुतेक शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर होती. मागील वर्षी कोरोना आटोक्यात आल्यावर या शाळा पालिकेने शिक्षण विभागाच्या ताब्यात दिल्या आहेत. शाळांच्या इमारती सॅनिटाईझ करण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात आले आहे. कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरु झाल्या आहेत. कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली.