अण्णांच्या उपोषणावर संजय राऊतांचा घणाघात - कृषी कायदे 2020
कृषी कायदे रद्द व्हावे यासाठी दिल्लीत अजूनही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला गालबोट लागले आहे. दरम्यान, जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे देखील शेतकऱ्यांसंबधीत आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत.
मुंबई - कृषी कायदे रद्द व्हावे यासाठी दिल्लीत अजूनही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला गालबोट लागले आहे. दरम्यान, जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे देखील शेतकऱ्यांसंबधीत आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन होऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या अण्णाबरोबर भेटीगाठी सुरू आहेत. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, तुम्ही आधी शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर करा. मग तुमचं आंदोलन सुरू करा, असा सल्ला अण्णा यांना दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची शेतकऱ्यांच्या आंदोलनावर चुप्पी -
देश हा योग्य दिशेने गेला पाहिजे. शेतकऱ्यांचे आंदोलन सरकारला दडपून टाकायचे आहे. 26 जानेवारीला जे झालं त्यात सरकारचा हात होता हे जगजाहीर झालं आहे. 2 महिने हे आंदोलन शिस्तबधपणे सुरू होतं. शेतकऱ्यांना मिळणारा पाठींबा आणि सहानुभूती कमी करायची म्हणून बदनाम केलं गेलं. संसदेचं अधिवेशन सुरू होत असल्याच्या शुभमुहूर्तावर लोकशाहीचा गळा घोटायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व विषयांवर बोलतात. मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनावर चुप्पी साधतात. कायदे हा लोकांसाठी असतात त्यांनीच ते स्वीकारले नाही, असेही राऊत म्हणाले.
आधी शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर करा-
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे या कृषी कायद्यांच्या विरोधात उपोषणाला बसणार आहेत. आमचा त्यांना प्रश्न आहे. तुम्ही आधी शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा आहे हे, जाहीर करा आणि मग तुमचं आंदोलन सुरू करा.
अण्णा हजारे यांनी एकदा त्यांची भूमिका स्पष्ट करावी-
अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीत भाजपाचे नेते प्रस्ताव घेऊ येत आहेत. मग तिथे बसून अण्णा तिथे चर्चा करत आहेत. स्पष्ट भूमिका घ्या, तुम्ही ठरवा, या बाजूला की त्या बाजूला? राहुल गांधींची भूमिका अगदी योग्य आहे. आमची ठरली आहे. शेतकरी दिल्लीत बसून लढत आहे. इथे बसून कशाला प्रस्तावांवर चर्चा करायच्या? अण्णा हजारे यांनी एकदा त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे राऊत म्हणाले.
अण्णांच्या भूमिकेकडे लक्ष-
अण्णा यांना आंदोलनाचा जास्त अनुभव आहे. मनमोहनसिंग यांचं राज्य असताना दोन आंदोलनं झाली. मग मधल्या सात वर्षात देशात सगळं आलबेल आहे का? आता माझं लक्ष अण्णांच्या भूमिकेकडे आहे असेही राऊत यांनी सांगितले.
हेही वाचा- चक्क आयसीसीने उडवली पाकिस्तानच्या क्रिकेटपटूची खिल्ली!
हेही वाचा- पहिल्या स्वदेशी आणि विनाचालक मेट्रोचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण