मुंबई - महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेत असूनही सापत्न वागणूक मिळत असल्याची तक्रार सातत्याने काँग्रेसच्या हायकमांडकडे करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर हायकामंडने तातडीची बैठक बोलावली होती. महाराष्ट्रातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते बैठकीला जाणारही होते. मात्र ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाविकास आघाडीत काँग्रेसला सापत्न - राज्यात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप नेते करत आहेत. काँग्रेसच्या विषयाबाबत अनेकदा एकाकी लढाई लढावी लागते. मित्र पक्षांकडून अपेक्षित साथ मिळत नाही. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा लढा देखील न्यायालयात एकट्याला लढावा लागला. काँग्रेसला साथ देण्याऐवजी मित्र पक्षांकडून कोंडी केली जाते. विकास निधी देण्याबाबत हात आखडता घेतला जातो. सत्तेत असूनही सातत्याने डावलले जाते, आदी तक्रारी काँग्रेसच्या नेत्यांकडून दिल्ली हायकमांडकडे केल्या होत्या. तक्रारींची दखल घेत हायकमांडने महाराष्ट्रातील नेत्यांना बैठकीला बोलावले होते.
दिल्लीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील नेत्यांची सोमवारी ३० मे रोजी बैठक होणार होती. मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी काँग्रेसचे नेते बैठकीला उपस्थित राहणार होते. मात्र आजची बैठक रद्द करण्यात आली. ही बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. काँग्रेस नेत्यांचा यामुळे हिरमोड झाला असून त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे.