मुंबई- ढोल-ताशाचा सरावाचा आवाज ऐकू यायला लागला, की गणेशोत्सवाची चाहूल लागते. गणेशोत्सव एक दिवसावर येऊन ठेपला तरीही मुंबईत ढोल-ताशा पथकाचा सराव कुठेही दिसून आला नाही. कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार असल्याचे चित्र आहे. गणेशआगमण आणि विसर्जन या दोन्ही दिवशी मिरवणूक काढण्यासाठी प्रशासानाकडून निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाही ढोल-ताशा वादनाचा सराव होतानाचे चित्र कुठेही पाहायला मिळत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र,या निर्णयामुळे ढोल ताशा वाद्यप्रेमींमध्ये निराशा दिसून येत आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंधामुळे गणेशत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. यंदाही गणेशात्सवाला शोभायात्रा, मिरवणूक याला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कित्येक ढोल वाद्य पथकांचे आर्थिक नुकसान देखील होणार आहे. ढोल- ताशा पथकांसह राज्यातल्या कानाकोपऱ्यांत हजारो लेझीम, पारंपरिक वाद्यांची पथके कार्यरत आहेत. परंतु, कोरोनामुळे या सर्व घटकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यात अशीही काही ढोल-ताशा पथके आहेत की जी फक्त संस्कृती आणि आवडीसाठी वाद्य वाजवण्याचे काम करतात. मात्र त्यांना देखील त्यांच्या छंदाला मुरड घालावी लागल्याने निराशेचे वातावरण आहे. तसेच एकीकडे सर्वच राजकीय कार्यक्रमांना परवानगी मिळत आहे. मात्र ढोल-ताशा पथकाला का नाही? असा देखील सवाल ढोल वादक करत आहेत.