नवी दिल्ली - रॅनबॅक्सीचा माजी प्रवर्तक शिविंदर सिंगला दिल्ली पोलिसाच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्यासमवेत तीन जणांनाही पोलिसांनी अटक केली आहे. रिलिगेअरने एन्टरप्रायजेसने दिलेल्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सिंग बंधूवर ७४० कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
दिल्ली पोलिसांनी शिविंदर सिंगसह त्याचा भाऊ मालविंदर सिंग याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कवी अरोरा, सुनील गोधवानी आणि अनिल सक्सेना अशी अटकेतील इतर तीन जणांची नावे आहेत. त्यांनी लोकांचा पैसा गोळा करून स्वत:च्या कंपनीत गुंतविल्याचा दावा करण्यात येत आहे.
रिलिगेअर फिनवेस्ट लि. कंपनीने दिल्लीच्या आर्थिक गुन्हे शाखेत गतवर्षी डिसेंबरमध्ये तक्रार दिली होती. त्यानंतर सिंग बंधूवर ७४० कोटींच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
चालू वर्षात ऑगस्टमध्ये सक्त आर्थिक अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रॅनबॅक्सीचा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मालविंदर सिंग आणि त्याचा भाऊ शिविंदर सिंग यांच्या घरांवर छापे टाकले होते. ईडीने मनी लाँड्रिंगप्रकरणी ही कारवाई केली होती.