पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात एका तरुणाकडून एक गावठी पिस्तुल आणि 3 जिवंत काडतुसे गुन्हे शाखेच्या युनिट-5 ने जप्त केले असून त्याला अटक केली आहे. राहुल सुखदेव गराडे (वय-19) असे आरोपीचे नाव असून तो अंगरक्षकाचे काम करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्याच्याकडून 54 हजार 500 रुपयांचे पिस्तुल आणि काडतुसे जप्त करण्यात आले आहेत.
गराडे बरोबरच पिस्तुल विक्री करणाऱ्या तैजीम अन्वर शेख याला देखील गुन्हे शाखेच्या युनिट 5 च्या कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट 5 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे आणि त्यांचे कर्मचारी गस्त घालत होते. दरम्यान, सोबत असलेले कर्मचारी धनराज किरणाळे आणि दत्ता बनसुडे यांना आरोपी राहुलबद्दल गुप्त माहिती मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी राहुल यास मावळ तालुक्यातील धामणे येथे सापळा रचून अटक केली.
पोलिसांनी राहुलकडून 1 पिस्तुल, 3 जिवंत काडतुसे जप्त केली असून राहुल आणि पुण्यातील तैजीम अन्वर शेख या दोघांना अटक केली आहे. त्यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात आर्म एक्ट 3(25) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहा पोलीस आयुक्त आर.आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी धनराज किराणाळे, दत्ता बनसुडे, स्वामीनाथ जाधव, मयुर वाडकर, संदीप ठाकरे, धनंजय भोसले, ज्ञानेश्वर गाडेकर आदींनी केली आहे.