पुणे - कोरेगाव भीमा येथे शौर्य दिनानिमित्त (Bhima Koregaon Shaurya Din) सालाबादप्रमाणे प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी व्यवस्था केली आहे. यामध्ये जवळपास 3 हजार पोलीस फौजफाटा तैनात (Police Security) करण्यात आला आहे. विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यातील व राज्याबाहेरील नागरिक, संघटना सामील होत असतात. त्यामुळे पुणे-अहमदनगर मार्गावरील पेरणे फाटा येथे गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये, वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहावी म्हणून वाहतुकीचे मार्ग बदलले आहे.
- वाहतूक मार्गात बदल -
पुणे शहरातून व पिंपरी चिंचवड शहराकडून अहमदनगरकडे जाणाऱया सर्व प्रकारच्या (पेरणेफाटा जयस्तंभाकडे जाणारी वाहने खेरीज करून) वाहनांनी ३१ डिसेंबरच्या पाच वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२२ रोजी रात्री 12 वाजेपर्यंत खालील पर्यायी मार्गांचा वापर करणेबाबतचे तसेच जयस्तंभास अभिवादनासाठी जाणाऱया नागरिकांसाठी वाहन पार्कीगस्थळे निश्चित केली आहेत.
- मार्ग -
१. पुणे बाजूकडून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड वाहतूक ही खराडी बायपास येथून हडपसर, पुणे सोलापूर हायवे रोडने केडगाव चौफुला न्हावरा, शिरुर मार्ग नगररोड अशी जातील.
२. सोलापूर रोडवरून आळंदी, चाकण याभागात जाणारी जड वाहतूक (टेम्पो ट्रक) ही मगरपट्टा, खराडी बायपासमार्ग विश्रांतवाडी येथून आळंदी व चाकण येथे जातील.
३. मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड वाहतूक (टेम्पो, ट्रक) ही वाहने वडगाव मावळ चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा मार्ग अहमदनगर अशी जातील.
४. मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी हलकी वाहने (कार, जीप) ही वाहने वडगावमावळ, चाकण, खेड, पावळ, शिरुर मार्गे अहमदनगर अशी जातील.
तसेच एकूण 12 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. फिरती शौचालय जागोजागी उभारले आहेत. मागील दोन वर्षांपूर्वीचा अनुभव घेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विजय स्तंभाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिसांची गस्त आहे.
तसेच कोणीही सोशल मीडियातून अफवा पसरू नये यासाठी प्रशासनाकडून आदेश दिले आहेत. सदर कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून पार पडावा यासाठी प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन केले आहे.