ठाणे : नवरा कामावर गेल्यावर घरात येऊन बायकोशी बळजबरीनं लगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मित्राला दारू पार्टी देऊन त्याची घरातच हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीनंच हत्या करून तक्रार दाखल करत बनाव रचल्यानं पोलिसांनी सुरुवातीला आकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र पोलीस तपासादरम्यान आरोपीनं संशयास्पदरितीनं उत्तरं दिल्यानं पोलिसांना संशय आला. त्यानंतर सखोल चौकशी केली असता, आरोपी नवऱ्यानं बायकोशी लगट करणाऱ्या मित्राची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली आहे. नरेश शंभु भगत (वय 30) असं अटक आरोपीचं नाव आहे. तर सुकांत परिडा (वय 29 ) असं हत्या झालेल्या मित्राचं नाव आहे.
नवरा कामाला गेल्यानंतर मित्र करायचा पत्नीशी लगट : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी नरेश हा बायकोसह बदलापूर पूर्वेतील शिरगांव, एमआयडीसी भागातील एका चाळीत राहतो. मृतक सुकांत हाही याच भागात राहणारा होता. विशेष म्हणजे दोघंही बिहार राज्यातील असल्यानं आरोपी आणि सुकांत एकमेकांचे जवळचे मित्र होते. मात्र मृतक मित्राची वाईट नजर मित्राच्या बायकोवर पडली. त्यानंतर आरोपी नवरा कामावर गेला की सुकांत त्याच्या घरी जाऊन बायकोशी बळजबरीनं लगट करायचा. सुकांतपासून होणाऱ्या वारंवार त्रासाला कंटाळून 15 दिवसापूर्वी बायकोनं आरोपी नवऱ्याला सुकांत करत असलेल्या वर्तनाची माहिती दिली. ही माहिती ऐकून आरोपी नरेशला राग आला. या रागातून त्यानं सुकांतची हत्या करण्याचा प्लॅन रचला. त्यासाठी त्यानं बायकोला आपल्या मूळ गावी बोबहा, मुझफ्फरपूर, बिहार इथं पाठवून दिलं.
मित्राचा काटा काढण्यासाठी बायकोला पाठवलं गावी : दुसरीकडं बायको मूळ गावी पाठवल्यानंतर आरोपी नरेशनं सुकांतला दारू पार्टीच्या बहाण्यानं आरोपीचं घर असलेल्या बदलापूर पूर्वेतील शिरगांव, एमआयडीसी भागातील एका चाळीच्या 4 नंबर खोलीत बोलावलं. त्याप्रमाणं 10 जानेवारी रोजी मित्र आरोपीच्या घरी गेला. त्याठिकाणी पार्टी करून सुकांतला भरपूर दारू पाजली. त्यानंतर 10 ते 11 जानेवारीच्या दरम्यान घरातील धुणीभांडी करण्याच्या जागेत डोक्यात जबर मारहाण केली. या महारहाणीत सुकांतचा मृत्यू झाला. सुरुवातीला आरोपीनं बनाव रचल्यानं बदलापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची पोलिसांनी नोंद केली.
शवविच्छेदन अहवालात खून केल्याचं झालं स्पष्ट : दरम्यान मृतक सुकांतचं शवविच्छेदन जे. जे. हॉस्पीटल मुंबई इथं करण्यात आलं. त्या अहवालात डोक्यात जड वस्तूनं मारून ठार केल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलीस पथकानं आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडं चौकशी केली. यावेळी सुरुवातीला आरोपीनं संशयास्पदरितीनं उत्तरं दिल्यानं पोलिसांना संशय आला. त्यानंतर आरोपीकडं सखोल चौकशी केली असता, आरोपी नवऱ्यानं बायकोशी लगट केल्यानं मित्राची हत्या केल्याची कबुली दिली. त्यामुळं पोलिसांनी वाढीव कलम म्हणून भारतीय न्याय संहिता कलम 103 प्रमाणं हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीला 12 जानेवारीला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली आहे.
हेही वाचा :