मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर मुख्यमंत्रिपदासंदर्भात बरेच तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रिपदी निवड जाहीर करण्यात आलीय. त्यानंतरही मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे अन् खाती मिळणार हे निश्चित होत नव्हते. शेवटी निर्णय झाल्यानंतर अखेर मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर करण्यात आलंय. आता राज्यातील विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री नेमके कधी ठरणार हे अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदाच्या निर्णयाकडे मंत्र्यांसोबतच राजकीय कार्यकर्त्यांचंदेखील लक्ष लागून राहिलंय. राज्यातील पालकमंत्रिपदाची घोषणा मकर संक्रांतीनंतर होण्याची शक्यता असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिलीय.
पालकमंत्रिपदाला एवढं महत्त्वं का? : जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्रिपदाला फार मोठे महत्त्व प्राप्त झालंय. जिल्हा नियोजन समिती ही अत्यंत महत्त्वाची समिती आहे. "जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विभागाच्या विकासासाठी निधी वितरीत केला जातो. पालकमंत्री हा जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष असतो. त्यामुळे कोणत्या विभागाला किती निधी वितरीत करायचा याचा निर्णय घेण्याचा अधिकार पालकमंत्री असलेल्या नेत्याकडे असतो. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्रिपदाला एक वेगळंच महत्त्व आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या प्रत्येक मंत्र्याला पालकमंत्रिपद मिळवण्याची इच्छा असते. पालकमंत्रिपदाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणावर अंकुश ठेवता येतो, त्यामुळे या पदाला अधिक महत्त्व प्राप्त झालंय. पूर्वीपासूनच पालकमंत्रिपदाला महत्त्व आहे. जिल्ह्याचे प्रमुख पद असल्यानं जिल्ह्यातील प्रत्येक नियुक्ती, बदली आणि निर्णय प्रक्रियेत पालकमंत्र्यांची महत्त्वाची भूमिका असते", असंही राजकीय विश्लेषक जयंत माईणकर म्हणालेत.
मंत्रिमंडळ विस्ताराला आणखी 10 दिवसांचा कालावधी : 5 डिसेंबरला राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात आलं असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ झालंय. मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतरही मंत्रिमंडळ विस्ताराला आणखी 10 दिवसांचा कालावधी लागलाय. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर मंत्र्यांच्या खातेवाटपाला विलंब झालाय. आता खातेवाटप पूर्ण झाल्यानंतरही अद्याप पालकमंत्रिपदाची घोषणा करण्यात आलेली नाही.
26 जानेवारीपूर्वी पालकमंत्री घोषित होण्याची गरज : 26 जानेवारी रोजी असलेल्या देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. मात्र, अद्याप पालकमंत्री घोषित करण्यात आलेले नसल्याने लवकरच 26 जानेवारीपूर्वी पालकमंत्री घोषित करावे, अशी मागणी केली जातेय.
मकर संक्रांतीनंतर निर्णयाची शक्यता - महाजन : पालकमंत्रिपद जाहीर व्हायला उशीर झालाय. मात्र, आता मकर संक्रांत झाल्यानंतर कदाचित याबाबत निर्णय होईल, असे आपल्याला वाटते, अशी माहिती जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांनी दिलीय. पालकमंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य तो निर्णय घेतील, असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय.
हेही वाचा -