सांगली - गोवा बनावटीची दारू तस्करी रोखण्यात सांगलीच्या उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे. ही दारू सांगली मार्गे पुण्याकडे नेण्यात येत होती. मात्र उत्पादन शुल्क विभागाने ही तस्करी हाणून पाडली. विभागाकडून 51 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 6 लाखांच्या विदेशी दारूचा समावेश असून, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे - बंगळुरू महामार्गावरील येलूर फाटा येथे झाली.
हेही वाचा - सांगलीत अवकाळी पावसाची धुंवाधार बॅटिंग, विजांच्या कडकडाटासह गाराही बरसल्या
गोव्यातून पुणे येथे तस्करी होणाऱ्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूचा साठा सांगलीच्या उत्पादन शुल्क विभागाने मोठ्या शिताफीने जप्त केला आहे. एका कंटेनरमधून हा गोवा बनावटीचा विदेशी दारूसाठा चोरट्या मार्गे तस्करी करण्यात येत होता. याबाबत सांगलीच्या उत्पादन शुल्क विभागाला माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे उत्पादन शुल्क विभागाने पुणे - बंगळुरू महामार्गावरील येलूर फाटा येथे नाकेबंदी करत संशयित कंटेनर ताब्यात घेऊन तपासणी केली.
तपासणी केली असता गाडीमध्ये गोवा बनावटीचा विदेशी दारूसाठा आढळून आला. यामध्ये 6 लाख 5 हजार 502 रुपये किंमतीच्या गोवा बनावटीच्या 180 मि.ली च्या 3 हजार 840 दारूच्या बाटल्यांसह मालवाहतूक करणारा कंटेनर जप्त करण्यात आला आहे. अंदाजे 51 लाख 7 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क सांगली अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा - Miraj Kolhapur Passenger Train : तब्बल दोन वर्षांनंतर कोल्हापूर मिरज पॅसेंजर सुरू